विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अॅलोपॅथी विरुद्ध भारतीय पुरातन वैद्यकीय पद्धत आयुर्वेदावरून काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ उडाला. भारतीय पुरातन वैद्यकीय पद्धतीच्या उपचाराचे वैज्ञानिक पुरावे आहेत का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यादरम्यान पाठदुखीचा एक रामबाण इलाज दिल्लीतील एम्सच्या वैद्यकीय अधिकार्यांनी शोधून काढला आहे. या इलाजाचे देश-परदेशातील प्रमुख वैद्यकीय नियतकालिकांनी दखल घेऊन कौतुक केले आहे. याला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने निधीही दिला. पुरातन वैद्यकीय पद्धतीच्या माध्यमातून गंभीर आजारांवर वैज्ञानिक तथ्यांसह उपचार करून लोकांना नवीन जीवन देणे हा याचा उद्देश आहे.
१०० रुग्णांवर संशोधन
दिल्लीतील एम्सचे फिजिओलॉजी विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रेणू भाटिया, डॉ. राजकुमार आणि फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन विभागाचे डॉक्टर श्रीकुमार व्ही. यांनी पाठीच्या खालच्या भागात होणार्या जुन्या वेदनांवर योगच्या माध्यमातून संशोधन करण्यास सुरुवात केली. या संशोधनात १०० रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांचे वय ५० वर्षांहून अधिक होते. या रुग्णांना गेल्या अनेक वर्षांपासून पाठीच्या खालच्या भागात खूप वेदना होत होत्या. ह्या वेदना पायापर्यंतही जाणवत होत्या.

विशेष योगासने
संशोधन करणार्या डॉक्टरांनी सांगितले, की या रुग्णांकडून काही विशेष योगासने करवून घेण्यात आले. या योगासनांमुळे पाठीच्या दुखण्यावर महिन्याभरातच आराम मिळाला. वेदना खूपच जुन्या असल्याने एका महिन्याच्या आत योगासनाद्वारे रुग्णांना आराम मिळाला की इतर औषधांमुळे याचे आकलन करणे अवघड होते. त्यामुळे संंबंधित रुग्णांकडून काही दिवसांपर्यंत योगासने करून घेण्यात आले. यामुळे रुग्णांमधील वेदना कमी झाल्याच शिवाय वेदनांच्या कारणांमध्येही बदल पाहायला मिळाला. जे कार्टिकल मोठे झाल्याने वेदना वाढल्या होत्या, त्या योगच्या माध्यमातून कमी झाल्या.
सहा महिने संशोधन
एम्सचे फिजिओलॉजी विभागात जवळपास सहा महिने चाललेल्या या संशोधनात सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ योगा अँड मेडिटेशन (सत्यम) प्रकल्पातर्फे योगच्या माध्यमातून दूर होणार्या आजारांच्या वैज्ञानिक पुराव्यांसाठी निधी देण्यात आला होता.
याबाबतचे संशोधन जर्नल ऑफ मेडिकल सायन्स अँड क्लिनिकल रिसर्च या परदेशातील प्रमुख वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यामाध्यमातून पाठीच्या खालच्या भागातील दुखणे बरे केले जाऊ शकतात. भविष्यात देश आणि परदेशात या पद्धतीने उपचार केले जावे यासाठी संशोधकांनी एम्सच्या पेन रिसर्च अँड टीएमएम प्रयोगशाळेत योग प्रोटोकॉलही तयार केले आहेत. त्याच आधारावर उपचार केले जाणार आहेत.