सिन्नर- गरीब महिलांना ‘तथापी’ व ‘युवा मित्र’कडून अन्नधान्य किटचे वितरण

सिन्नर- सध्याच्या कोविडच्या संकटाच्या काळात ग्रामीण भागात रोजगार गमावून बसलेल्या तालुक्यातील ५० गरीब महिलांना पुणे येथील ‘तथापी ट्रस्ट’च्या सहकार्याने युवा मित्र’च्यावतीने कुटुंबाला १५ दिवस पुरेल अशा
किराणा किटचे नुकतेच वितरण करण्यात आले. सनदी लेखापाल सौरभ यार्दी यांच्या हस्ते कीट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. ‘युवा मित्र’च्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे, सेक्रेटरी विलास पाटील, सहयोगी संचालिका शीतल डांगे यावेळी उपस्थित होते. तथापी ट्रस्ट,पुणे महिलांच्या आरोग्यावर प्रशिक्षण देण्यापासून महिलांसाठी राज्यभर विविध उपक्रम राबवते. कोरोनाच्या आजच्या संकटाच्या काळात ग्रामीण भागात रोजगार गमावलेल्या महिलांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेत तथापी ट्रस्ट, पुणे व युवा मित्र यांच्या सहयोगाने अन्नधान्य किट वितरीत करण्यात आले. ग्रामीण भागातील कुटुंबांच्या दैनदिन आहारातील पोषण मूल्य वाढावीत व त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी
यासाठी त्यात १० किलो बाजरी, एक किलो गोडेतेल, २ किलो शेंगदाणे,१ किलो गुळ,१ किलो मठ, १ किलो मुग, उडीद, बेसन, चहा पावडरसह दैनंदिन लागणारा किराणा व १२ अंडी यांचा समावेश करण्यात आला आहे. आज तालुक्यातील ५० गरीब महिलांना या किटचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती मनीषा पोटे यांनी दिली. ‘युवा मित्र’चे काम माहित होते. आज त्या कामाचा साक्षीदार होता आले. संस्थेचे काम अभिमानास्पद असल्याचे यार्दी म्हणाले. कोरोनाच्या या संकटाच्या काळात घरातून बाहेर पडण्याची भीती वाटत होती. अशा काळात झालेली ही मदत प्रेरणादायी असल्याची भावना मनीषा वेलजाळी यांनी व्यक्त केली. घराच्या शेजारी असणाऱ्या रुग्णाकडे मदतीसाठीही जाण्याची हिम्मत होत नव्हती, अश्या काळात माणुसकी जपण्याचं काम तथापी ट्रस्ट व युवा मित्रने केले असल्याचे स्वाती गांजवे म्हणाल्या. सूत्र संचलन हरी डावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश पांगारकर, पंकज गोर्डे, माधुरी मंडलिक यांनी परिश्रम घेतले. यावेळी ठाणगाव, आडवाडी, धोंडबार, औन्धेवादी, रामनगर, केपानगर, सोनेवाडीसह तालुक्याच्या विविध गावांमधील महिला उपस्थित होत्या.