किसिंग वाद बाजूला ठेवत राखी सावंत पडली मिका सिंगच्या पाया (बघा व्हिडिओ)

विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि नृत्यांगणा राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहाते. राखीचे अनेक जुने वाद चित्रपटसृष्टीत खूपच चर्चेत होते. त्यापैकी एक चर्चित वाद म्हणजे मिका सिंग आणि राखी सावंतदरम्यानचा. परंतु आता दोघांनीही मागचे शत्रुत्व विसरून चांगले मित्र बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरूनच त्यांची पुन्हा मैत्री झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत मिका सिंगचे नुसते कौतुकच करत नाहीये तर ती त्याच्या पाया पडत आहे.
राखी सावंत आणि मिका सिंग यांचा व्हायरल व्हिडिओ बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जवळपास १५ वर्षांनंतर कोणताही वाद नसताना राखी आणि मिकाची मुंबईतील एका कॉफी शॉपच्या बाहेर भेट झाल्याचे दिसत आहे. राखी सावंत कॉफी शॉपवर छायाचित्रकारांशी बोलत होती, तेव्हा तिथे राखीला पाहून मिका सिंग पोहोचला आणि तिची गळाभेट घेतली. आम्ही दोघेही आता मित्र झालो आहोत, असे त्यांनी
छायाचित्रकारांसमोर सांगितले. व्हिडिओमध्ये मिका सिंग सांगताना दिसतो की, तिथून जात असताना राखी सावंतला पाहून थांबलो. बिग बॉस हा शो फक्त राखी सावंतमुळे चालला, असेही मिका सिंग म्हणाला. हे ऐकून राखी सावंत आनंदाने मिका सिंगच्या पाया पडते. मिका आणि राखीचा हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचे प्रशंसक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
बघा व्हिडिओ…