अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शिवसेनेत बंडखोरी करणारे नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात जाण्याची तयारी दर्शविली आहे. आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी शिर्डी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
हिंदुत्व व विकासकामांच्या मुद्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडाचे हत्यार उपसले आहे. जवळपास २० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर हे आमदार आता आपआपल्या मतदारसंघात पोहचले आहेत. या आमदारांचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागतही केले. त्यानंतर आता हे आमदार माध्यमांशी बोलताना आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागले आहेत.
कांदे म्हणाले की, ‘आमच्या मनात आजही मातोश्रीबद्दलचा जिव्हाळा कायम आहे. आम्हाला आजही मातोश्रीवर येण्याचे आदेश द्यावे, अशी इच्छा आहे. परंतु बोलावणे आले तर एकटा जाणार नाही, सर्वांना सोबत घेऊन जाईन असे मोठे विधान त्यांनी केले.’ कांदे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कांदे यांनी स्पष्ट केले की, आम्ही गुवाहाटीत होतो त्यावेळी साईबाबांकडे प्रार्थना केली होती की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत. बाबांनी माझी मागणी पूर्ण केली आणि मला न्याय दिला. त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आलो. हे राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याचा विकास होवो, असे साकडे साईबाबांना घातल्याचेही कांदे म्हणाले. ज्यांच्यावर मी खुप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल, असे म्हणत कांदे यांनी मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, असेही स्पष्ट केले.
कांदे म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर आमची खदखद नव्हती. आमची कामे होत नव्हती. विकासकामांसाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, संजय राऊत आमच्या चाळीस मतांवर खासदार झाले असतानाही ते आम्हाला रेडा, डुक्कर म्हणालेत. ते मोठे आणि ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, असा टोला कांदे यांनी राऊतांना लगावला.
Shivsena Rebel MLA Suhas Kande on Matoshri and Uddhav Thackeray Matoshri