मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेने आता खुले आव्हान दिले आहे. कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या नांदगाव मतदारसंघात शुक्रवारचा दिवस अतिशय तणावपूर्ण होता. कांदे यांनी बंडखोरी केल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मेळावा मनमाडमध्ये झाला. त्या मेळाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कांदे यांनीही मोठा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. राज्यात पहिल्यांदाच बंडखोर आमदार आणि ठाकरे हे जवळपास समोरासमोर आले. त्यामुळे ही बाब राज्यपातळीवरच चर्चेची ठरली. आता शिवसेनेने कांदे यांना खुले आव्हान दिले आहे.
कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना १० प्रश्न विचारले होते. माझे काय चुकले या नावाने त्यांनी त्यांचे निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात कांदे यांनी नमूद केले होते की, आदित्य ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरण खाते होते. मी असंख्य पत्रे दिली पण आदित्य यांनी काहीच निधी दिला नाही. त्यांनी किती निधी दिला हे सांगावे, मी तत्काळ आमदारकीचा राजीनामा देतो, असे आव्हान कांदे यांनी दिले होते. त्यानंतर शिवसेनेने आता नांदगाव मतदारसंघात दिलेल्या निधीची अधिकृतपणे माहिती सादर केली आहे. कांदे यांनी पर्यटन विभागाला दिलेल्या शिफारस पत्रांनुसार एकूण ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. ही कामे नक्की कोणती आहे त्याचा तपशीलही सोबत देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब पाहून आता कांदे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान शिवसेनेने दिले आहे. यासंदर्भात आता कांदे काय प्रतिक्रीया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1550459683772608513?s=20&t=8WejzcweKvsVT_X4fptjhQ
Shivsena Open Challenge to Rebel MLA Suhas Kande