मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राऊत यांची तुरुंगातून बाहेर येण्याची प्रतीक्षा आता वाढणार आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने राऊतांच्या जामीनाला मुंबई सत्र न्यायालयात तीव्र विरोध केला आहे. राऊत हे महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. ते सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. विशेष ईडी न्यायालयाने राऊतांना १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने राऊतच्या जामीन अर्जावर ईडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता ईडीने उत्तर दाखल केले आहे. प्रत्युत्तरादाखल ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला स्पष्टपणे विरोध केला आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात दावा केला होता की, ईडी तपास सुरू ठेवू शकते, परंतु त्यांना तुरुंगात ठेवल्याने काहीही होणार नाही. राऊत यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, न्यायालयातील व्यस्ततेमुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होऊ शकली नाही.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने (म्हाडा) सदनिका बांधण्याची योजना २००७ साली सुरू केली. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये हे काम होणार होते. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. म्हाडाच्या ४७ एकर जागेत ६७२ घरे बांधण्यात आली आहेत. कंपनीला साडेतीन हजार फ्लॅट्स बनवायचे होते. सदनिका बांधल्यानंतर उर्वरित जमीन विकली जाईल, अशी म्हाडाची योजना होती. मात्र, १४ वर्षे उलटूनही कंपनीने येथे फ्लॅट बांधले नाहीत. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने म्हाडाची फसवणूक करून सदनिका न बांधता जमीन बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे. यामुळे ९०१ कोटींहून अधिक नफा झाला. कंपनीने नंतर दुसरा प्रकल्प सुरू करून खरेदीदारांकडून १३८ कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. कंपनीने चुकीच्या पद्धतीने १०३४ कोटी रुपये कमावले आणि ती रक्कम आपल्या सहयोगींमध्ये वाटली. ही कंपनी HDIL ची सहयोगी कंपनी आहे. त्यात प्रवीण राऊत सूत्रधार होते.
संजय राऊत यांचा संबंध
२०१८ मध्ये म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले. २०२० मध्ये प्रवीण राऊतला अटक करण्यात आली होती, जो संजय राऊतचा जवळचा आहे. प्रवीण राऊत हे सारंग आणि राकेश वाधवन यांच्यासह कंपनीचे संचालक होते. पीएमसी बँक घोटाळ्यात वाधवान बंधूही आरोपी आहेत.
Shivsena MP Sanjay Raut ED Custody Court
Money Laundering Patra Chawl Scam