मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “बाहेर पडू नका, तुमच्यावर कुणीही हल्ला करू शकतं”, असे इनपुट्स मला पोलिसांकडून मिळाले असल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. “माझ्याकडे ५ वर्षाचं बाळ आहे ते मी शिवसेनेला दत्तक देणार आहे. सगळे शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील. आम्ही करेंगे और मरेंगे याच भावनेने लढतोय” अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला.
जीवाला धोका असल्याचे सांगत पुढे त्या म्हणाल्या, “विद्यापीठात आंदोलन करताना पोलीस माझ्या बाजूला आले. तुम्ही सुरक्षित आहात का? अशी विचारणा झाली. पोलिसांकडे काही माहिती असल्याने ते अलर्टवर आहेत असं कळालं. माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो. कमरेखालचे वार केले जाऊ शकतात त्यापलीकडे मला अडवण्यासाठी दुसरं काही केले जाऊ शकत नाही. आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. माझ्या सोसायटीखाली २ कॉन्स्टेबल येऊन बसले. मला सुरक्षा द्यायचं म्हणतायेत. मी याबाबत उद्धव ठाकरेंना माहिती दिली. दिवसभर माझ्यावर तणाव होता. माणूस म्हणून भावनिक असतो. जे होईल ते होईल. बाळाची चिंता वाटली मग नंतर विचार केला त्याची जबाबदारी घ्यायला शिवसैनिक खंबीर आहेत” असं त्यांनी सांगितले.
“माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी शांत होईन असं वाटत असेल तर भ्रमात आहे. जागे व्हा अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच मी सामान्य घरातील महिला आहे. माझ्याकडे पैसा नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. सुषमा अंधारे शिवसेना उभी करण्याची कामी येत असेल तर गर्व आहे”, असेही त्या म्हणाल्या.
Shivsena Leader Sushma Andhare Press Conference