मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विविध निर्णयांमध्ये बदल करण्याचा सपाटा शिंदे सरकारने सुरू केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात सत्ता आणि राजकीय नाट्य सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांची २९ जून रोजी बदली केली होती. त्याच दिवशी ठाकरे यांच्या नेतृत्वात अखेरची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यात बदल्यांचा निर्णय घेण्यात आला होता. आणि काही तासांनंतर उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या क्षणी केलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी, औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची औरंगाबाद सिडको मुख्य प्रशासकपदी तर, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचा समावेश होता. या तिन्ही बदल्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे.
Shinde Government stay to MVA Government decision of IAS Officers Transfer