जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नवीन राजकीय समीकरणाबाबतचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनी केला आहे. त्यांनी सत्ताबदलाबाबत कबुली दिली असून त्यांच्या या स्पष्टीकरणाने पुन्हा एकदा यावर चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या बाजुला बसतो यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात आणि संध्याकाळी तिसऱ्यासोबत सरकार बनवतात त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नसल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केली. अजित पवार यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली होती. उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी पुण्यात केली होती. या टिकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं.
पुण्यातील प्रचारात झाली नारेबाजी
पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोदरम्यान जोरदार नारेबाजी झाली. काही जणांनी गद्दार, गद्दार अशा घोषणा दिल्यात. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दहा वीस टिपुकले लोक आहेत, ते बोंबलत असतात. जनतेची कामे करा, काम करणाऱ्यांच्या मागे जनता आहे, हा कायमचा अनुभव असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
Shinde Cabinet Minister on Rebel Politics