इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीने प्रख्यात रिअॅलिटी शो बिग बॉस शोमध्ये शानदार परफॉर्मन्स दिला. बिग बॉस सीझन 15 चा भाग असलेली शमिता ही शेवटपर्यंत या गेममध्ये राहिली. जवळपास 3 महिने बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर, अलीकडेच या कार्यक्रमात तिने सहकारी कलाकरांसोबत वाढदिवस साजरा केला. या खास सोहळ्याला शमिता शेट्टीची मोठी बहीण शिल्पा शेट्टी आणि मेहुणा राज कुंद्राही उपस्थित होते.
राज कुंद्रा हे छायाचित्रकारांना टाळत शांतपणे रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे दिसले. जेव्हा शमिता बिग बॉस ओटीटीचा भाग होती, तेव्हा तिचा मेहुणा राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिची बहिण शिल्पा शेट्टी सुद्धा टीकेची धनी बनली होती. शमिताने या संपूर्ण घटनेवर आणि राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
शमिता म्हणाली की, ‘त्या कठीण काळात मी शिल्पासोबत नव्हते, याचे मला खूप वाईट वाटते. मला तिच्यासोबत राहून खूप आनंद झाला असता. कारण मला आठवते की, मी बिग बॉस ओटीटीमध्ये असताना मला तिची खूप काळजी वाटत होती. शिल्पा बाहेरची परिस्थिती कशी हाताळत आहे, हे मला समजत नव्हते. मला बाहेर काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते कारण आम्ही खूप जवळ आहोत. जेव्हा केव्हा आम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला, तेव्हा आम्ही खंबीरपणे बाहेर आलो आहोत, या संपूर्ण घटनेने आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालो आहोत. मला तिचा खूप अभिमान आहे.’ तसेच ‘बिग बॉस’मध्ये या घटनेनंतर ट्रोल झाल्याबद्दल शमिता म्हणाली, ‘माझा या संपूर्ण घटनेशी काहीही संबंध नव्हता, ते अत्यंत दुर्दैवी होते.’ तसेच मी बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही बाहेर खूप चर्चा सुरू होत्या.