सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात सध्या एका शाही विवाह सोहळ्याची जबरदस्त चर्चा आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्या जेष्ठ चिरंजीवांच्या लग्न समारंभाची. हा शाही विवाह सोहळा उद्या, रविवारी होणार आहे. या सोहळ्याची लगबग जिल्ह्यात सध्या सुरू आहे. सोहळ्याच्या निमंत्रणासाठी दोन लाख लग्नपत्रिका, मतदारसंघासह वाळवा तालुक्यात घरटी पोहोचलेले आग्रहाचे आवतन, हजारो चौरस फुटांचा शामियाना, चकाचक बनलेले रस्ते, एकाच वेळी हजारो लोकांची जेवणाची व्यवस्था आणि दिग्गजांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झआली आहे. सांगलीतील इस्लामपूरनगरीत हा शाही विवाहसोहळा होणार आहे.
विवाहासाठी राजारामनगरमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. वधूवरांसह यजमान शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ज्या स्थळी उभे राहणार आहेत, त्या व्यासपीठाची एक मंदिर, घंटा या रूपात सजावट करण्यात आली आहे. या व्यासपीठासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था असून महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. बियाणे मळा परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून एका वेळी पाच हजारांना याचा लाभ घेता येईल अशी सोय करण्यात आली आहे.
कासेगावच्या पाटलांच्या वाड्यावर गेला महिनाभर लगीनघाई सुरू असून स्व. राजारामबापू पाटील यांचे नातू प्रतीक यांचा विवाह रविवारी (दि. २७) रोजी सायंकाळी ५.३५ या मुहूर्तावर राजारामनगर येथे होत आहे. यासाठी उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका ही वधू नेमस्त केली आहे. या विवाहाची चर्चा राजकीय व सामाजिक पातळीवर गेला महिनाभर सुरू आहे. तुलसी विवाहापासून तर मंडप उभारणी, केळवणासह अन्य विधी संगीत रजनीच्या साथीने सुरू आहेत.
‘याची देही, याची डोळा’ हा शाही विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मंडपामध्ये आठ ठिकाणी ‘क्लोज सर्किट’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यापूर्वी जमलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी खास मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळी पाच हजार लोकांना पंगतीचा लाभ घेता यावा अशी व्यवस्था करण्यात आली असून श्रीखंड पुरी, मसाले भातासह अनेक पदार्थाचा बेत ठरला आहे.
दिग्गजांची उपस्थिती..
या शाही विवाहसोहळ्यासाठी अनेक दिगज्जांची उपस्थइती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार, साखर कारखान्याचे अध्यक्ष, विविध पक्षांचे राज्यपातळीवरील नेते या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/vaishnavikaran4/status/1595710380374126593?s=20
Shahi Vivah Wedding Ceremony 2 lakh Invitation Cards