इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युट्यूबवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओच्या सहकार्याने दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत फेरफार करत आर्थिक लाभ मिळविल्या प्रकरणी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतर अशा एकूण ४५ जणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. बाजार नियामक ‘सेबी’ने त्यांना एक वर्षासाठी भांडवली बाजारातील व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे.
गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओमधून, दूरचित्रवाणी वाहिनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि नवी दिल्लीस्थित प्रसारण क्षेत्रातील कंपनी शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची शिफारस करण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले युट्यूब व्हिडीओ तयार करून प्रसारित केल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. समभागांच्या किमती फुगवून स्वत:पाशी असलेल्या समभागांची विक्री करून मोठा आर्थिक लाभ मिळविण्यात आला.
वारसी जोडप्याव्यतिरिक्त साधना ब्रॉडकास्टच्या काही प्रवर्तकांनाही बाजारात व्यवहारांवर बंदी आणली आहे. बाजार – व्यवहारांवर बंदीव्यतिरिक्त, नियामकांनी दोन वेगळ्या अंतरिम आदेशांनुसार या प्रकरणी आरोपींनी बेकायदेशीररीत्या कमावलेल्या ५४ कोटींच्या नफ्यावरही जप्ती आणली आहे. साधना ब्रॉडकास्टच्या समभागांच्या किमती फुगवून, अर्शद वारसीला २९.४३ लाख रुपयांचा नफा झाला तर त्याच्या पत्नीला ३७.५६ लाख रुपयांचा नफा झाला. त्याचा भाऊ इक्बाल हुसैन वारसीला ९.३४ लाखांची कमाई झाल्याचे सेबीने नमूद केले आहे. भांडवली बाजार नियामकांनी या तिघांना ‘व्हॉल्यूम क्रिएटर्स’ म्हणून आदेशपत्रात म्हटले आहे.
सेबीने तक्रारीची दखल घेऊन एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतील संबंधित दोन कंपन्यांच्या समभागांसंबंधी रीतसर तपासणी केली आणि त्यात एप्रिल ते जुलै २०२२ च्या मध्यापर्यंत दोन कंपन्यांच्या समभागांची किंमत आणि उलाढाल लक्षणीय वाढल्याचे दिसले. जुलै २०२२ च्या उत्तरार्धात, साधनाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे ‘द अॅडव्हायजर’ आणि ‘मनीवाइज’ हे दोन व्हिडीओ युट्यूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते. शार्पलाइनबद्दलही गेल्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात ‘मिडकॅप कॉल्स’ आणि ‘नफा यात्रा’ या नावाखाली दोन व्हिडीओही प्रसारित करण्यात आले होते.
दोषी ४५ जणांना, पुढील आदेश दिला जाईपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे/ समभागांची खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सर्वाना ‘सेबी’च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेल्या पैशासह जंगम किंवा स्थावर कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.
https://twitter.com/ArshadWarsi/status/1631242225496489984?s=20
SEBI Strong Action Against Actor Arshad Warsi and His Wife