विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा व कॉलेज बंद असून सध्या ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र आता कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याने पुन्हा शाळा सुरु होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही राज्यांमध्ये पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होत आहेत.
तिसर्या लाटेचा धोका असल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांना अद्याप शाळा बंद ठेवण्याची इच्छा आहे. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे कित्येक राज्यांतून कडक लॉकडाउन हटविण्यात आले आहेत. दैनंदिन जीवन परत रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान लक्षात घेता अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
या राज्यांमध्ये सुरू होणार शाळा
उत्तराखंड
राज्य सरकारने १२ जुलैपासून सर्व शाळा म्हणजे इयत्ता १ ते १२ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, विद्यार्थ्यांच्या येण्यावर बंदी असेल. सध्या फक्त शिक्षक व कर्मचारी शाळेत येतील. शिक्षणमंत्री अरविंद पांडे म्हणाले की, आत्ता तरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणच सुरू राहील.
बिहार
येत्या १२ जुलैपासून बिहारमध्येही शाळा पुन्हा उघडतील. मात्र सध्या दहावीच्या वर शाळा, महाविद्यालये सुरू होतील. आता फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांनाच बोलावले जाईल. वर्गात शारीरिक अंतरासाठी प्रयत्न केले जातील. सरकार शिक्षक-पालकांच्या बैठका ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश सरकारने १६ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ जुलैपासून ऑनलाईन वर्ग सुरू होतील. शिक्षकांना १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान वर्कबुकवर प्रशिक्षण दिले जाईल.
राजस्थान
शाळा सुरू करण्यात आल्या असून नवीन सत्रासाठी प्रवेश घेण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी नाही. दुसरीकडे, शिक्षणमंत्री गोविंद दोत्सरा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लागण कमी झाल्यानंतर किंवा शाळा लस उपलब्ध झाल्यावर शाळा सुरू केल्या जातील.
तेलंगाणा
तेलंगणामध्ये शाळा पुन्हा उघडल्या. तेलंगणा सरकारने राज्यात ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केजी ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे वर्ग १ जुलैपासून पुन्हा सुरू झाले आहेत.
उत्तरप्रदेश
सध्या शाळा बंद आहेत. आता असा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे की, १९ जुलैपासून इयता ९ ते १२ आणि त्यानंतर २ ऑगस्टपासून इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या मुलांसाठी शाळा सुरू कराव्यात.
राजस्थान
शाळा फक्त प्रशासकीय कामांसाठी उघडण्यात आली आहेत. परंतु, नव्या सत्राची प्रवेश प्रक्रीया तिथे सुरू झाल्या आहेत.
मध्यप्रदेश
ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. यापूर्वी राज्यात १ जुलैपासून शाळा सुरू होणार होती, परंतु नंतर तो निर्णय पुढे ढकलण्यात आला.