विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सारे काही सुरू होत आहे. मॉल, सिनेमागृह, बाजारपेठांमध्ये पुन्हा वर्दळ वाढली आहे. मात्र अद्याप शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जुलैमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा आढावा घेऊन परीक्षा आणि प्रवेशांसाठी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. त्यासाठी सर्व राज्यांशी केंद्राची चर्चा सुरू झाली आहे.
शाळा सुरू करण्याच्या संदर्भात विचारविनीमय करतानाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यावरही जोर दिला जात आहे. सर्व राज्यांना त्यादृष्टीने निर्देश देण्यात आले आहे. पण अद्याप वर्ग भरविणे किंवा विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शाळेत बोलविण्यावर विचार झालेला नाही. केवळ प्रवेश व परीक्षा या दोन प्रक्रिया वेगाने होण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल आल्यानंतर या दोन्ही प्रक्रिया वेगाने होण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे कोरोनाची तिसरी लाट मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारी असेल, असा अंदाज असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यावर एवढ्यात तरी निर्णय होणार नाही, हे स्पष्ट आहे.
राज्यांना अधिकार
सर्व राज्यांना त्यांच्या भागातील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची सूट देण्यात आली आहे. जुलै आणि आगस्टमध्ये इंजिनियरिंगमध्ये प्रवेशासाठी जेईई मेनच्या दोन प्रलंबित परीक्षा आणि मेडिकल प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांचे पहिल्या टप्प्यातील अनलॉक विचारात घेण्यात आले आहे.
दिल्लीत ऑनलाईन वर्ग
दिल्लीमध्ये सर्व शाळांचे वर्ग ऑनलाईन होतील, असा निर्णय पहिलेच घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कुठल्याच निर्णयाचा दिल्लीत परिणाम होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशात मात्र शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. अश्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा लवकरच सुरू होतील, असे दिसत आहे.