आयआयटीतून शिकलेल्या तरुणांनी चक्क भाड्याने कपडे देण्याचा उद्योग सुरू केला तर तुम्हाला त्याविषयी काय वाटेल. पण, तीन तरुणांनी ही भन्नाट कल्पना व्यावसायिक पातळीवर अतिशय यशस्वी केली आहे. त्यामुळेच तिचा आज देशभरात बोलबाला आहे.
प्रा. डॉ. प्रसाद जोशी (लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
तुमच्या कडे असलेले महागडे डिझायनर ड्रेस तुम्ही यापूर्वी कधी वापरले होते आठवतंय? एकतर हे ड्रेस इतके महाग असतात, त्यामुळे ते आपण दैनंदिन जीवनात वापरू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे मोठ्या समारंभांमध्ये मागच्या वेळेला हा ड्रेस वापरला होता, त्यामुळे पुन्हा पुन्हा देखील ते घालता येत नाहीत. यामुळेच मोठ्या हौशीने आणि विशेष कार्यक्रमांसाठी घेतलेले महागडे डिझायनर उंची वस्त्र हे कपाटात पडून पडूनच खराब होतात. तसेच त्याचा फारसा वापर होत नाही. त्यातच पुढचा समारंभ आला की नवीन ड्रेस देखील तितक्याच मोठ्या किंमतीचा घ्यावा लागतो किंवा घेतला जातो. पुन्हा नव्या ड्रेसचेही तसेच.
हा प्रश्न आणि ही अडचण केवळ तुमचीच नसून बहुतांशी लोकांना याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. मध्यमवर्गीयांपासून अगदी सेलिब्रिटी व फिल्मस्टार्स पर्यंत देखील. उच्चभ्रू लोकांमध्ये तर एकदा वापरलेले ड्रेस पुन्हा वापरणे म्हणजे कमीपणाचे लक्षण मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक वेळेला हजारो आणि लाखोंचे ड्रेस विकत घेणे याखेरीज त्यांच्याकडे पर्याय देखील उरत नाही. मोठ्या ब्रँडचे आणि डिझायनर ड्रेसच्या किंमती या गगनाला भिडलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन ड्रेस घेणे देखील लोकांना खरंच परवडणार?
या अडचणींवर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे ‘फ्लायरोब’ या कंपनीने. कुठलाही सण असू द्या किंवा कुठलाही समारंभ, त्यासाठी लागणारे भरजरी वस्त्र तेही डिझायनर आणि ब्रँडेड ज्यांची बाजारातील किंमत काही हजारांपासून लाखापर्यंत आहे. असे सर्व वस्त्र केवळ १० ते २० टक्के भाडेतत्त्वावर मिळवता येतात. आणि ते देखील ऑनलाईन. डिझायनर लेंगा, घागरा, साड्या व इतर सर्व प्रकारचे समारंभात लागणारे कपडे आणि त्यासोबतच ब्लेझर, थ्री पीस सूट, शेरवानी, कुर्ता, पायजमा असे सर्व प्रकारचे वस्त्र अतिशय माफक भाडे घेऊन चार दिवस वापरण्यासाठी फ्लायरोब कडून दिले जातात. आणि या रेंटल बिझनेस मधून आज फ्लाय रोबने केवळ पाच वर्षांमध्ये कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण केला आहे.
आयआयटी मुंबई मधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेली श्रेया मिश्रा २०१२ मध्ये युनिव्हर्सिटी येथे एका उद्योजकता कॉन्फरन्स साठी गेली असता तिला भाडेतत्त्वावरतून उभा राहू शकणार्या मोठ्या व्यवसायाची कल्पना आली. एकदाच ऍसेट निर्माण करायची आणि त्याचं सुटला वारंवार भाडेतत्वावर देऊन त्यातून उत्पन्न कमवायचे ही संकल्पना तिला फारच आवडली. तिने पुन्हा भारतात येऊन मुंबईमधील आपले दोन मित्र तुषार सक्सेना आणि प्रणय सुराणा यांच्यासमोर आपल्या मनातील विचार मांडले. कल्पना चांगली होती पण नेमका व्यवसाय कुठल्या वस्तूंचा करायचा हे मात्र नक्की होत नव्हते.
स्वतः एक स्त्री असल्याने श्रेयाला देखील वरील अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तेव्हा याच प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी एक व्यवसाय निर्माण करूया का असा विचार सुरू झाला. कल्पना तिघांनाही पटली होती परंतु केवळ कल्पनेच्या आधारावर व्यवसायात उडी घेण्यापूर्वी मार्केट रिसर्च करणे गरजेचे आहे, असं तिघांनाटी वाटलं. त्यामुळे त्यांनी लगेचच मुंबई सारख्या बड्या शहरांमधील भारतीय महिलांचा सर्वे करण्यास सुरुवात केली. साधारण दोनशे महिलांचा सर्वे यासाठी करण्यात आला. या सर्वेतून महिलांच्या फॅशन संबंधित वस्तूंबद्दलची मते, त्यांच्या गरजा व या नवीन बिझनेस संकल्पनेबद्दलचे मत त्यांनी जाणून घेतलं. तेव्हा ८०% महिलांकडून त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणि या जोरावर त्यांनी फ्लाय रोब या कंपनीच्या प्लॅनिंग ला सुरुवात केली.
व्यवसायाची कल्पना श्रेयाची, संपूर्ण बिझनेस मॉडेलची जबाबदारी तुषारची तर संपूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या या कंपनीचे आयटी संबंधित काम सांभाळले ते प्रणय याने. २०१५ साली कंपनीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यावेळी केवळ महिला ग्राहकांवरच केंद्रित असा हा व्यवसाय निर्माण करण्यात आला होता. सुरुवातीला केवळ मुंबई शहरावर फोकस करण्यात आलं.
मुंबई शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये सुरुवात करण्यात आली असून सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग या कंपनीने केला. तुम्हाला गरज असलेल्या वेळेपेक्षा किमान तीन तास आधी देखील तुम्ही ड्रेस ऑर्डर करू शकता. तुम्ही ऑर्डर केलेला ड्रेस पुढील काही तासातच तुमच्याकडे कंपनीचे टेलर्स घेऊन येतील आणि तुमच्या गरजेप्रमाणे फिटिंग देखील करून देतील. हा ड्रेस तुमच्या ताब्यात तुम्ही चार दिवस ठेवू शकता. आणि चार दिवसांनंतर कंपनीचेच माणसे येऊन पुन्हा तो ड्रेस घेऊन जातील.
मोफत पिक अप आणि डिलिव्हरी असल्याने अनेक लोकांना ते सोयीचं वाटतं. ड्रेस ताब्यात घेताना ग्राहकाने मूळ किमतीच्या २० टक्के रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. आणि ड्रेस परत करताना अर्धी रक्कम ही ग्राहकाला परत केली जाते. म्हणजे केवळ दहा टक्के मूल्य देऊन तुम्ही अतिशय महागडे भरजरी व तुमच्या मापात असलेले कपडे कुठल्याही समारंभात तुम्ही वापरू शकता.
कंपनीच्या व्यवसायाची सुरुवात एका ॲप मधून करण्यात आली. सर्व ग्राहकांना हे ॲप सर्व प्रकारची उपलब्ध वस्त्र पाहण्यासाठी व त्यांची उपलब्धता देखील चेक करता येण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यावरूनच तुम्ही तुमच्या ड्रेसची ऑर्डर देऊ शकता आणि त्याचे डिलिव्हरी ट्रेकिंग देखील करू शकता. ऑनलाइन पेमेंट देखील सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे. काही काळातच ॲप सोबतच स्वतःची वेबसाईट देखील या कंपनीने सुरू केली. व्यवसायाचे रेंटलचा असला तरी त्यात प्रामुख्याने काम हे ऑनलाईनच होत असतात.
मुंबईत सुरू केलेला हा व्यवसाय झपाट्याने वाढत बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद अशा बड्या शहरांमध्ये पोहोचला. ग्राहकांच्या पसंतीला देखील हा व्यवसाय तितकाच खरा उतरला आहे. लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन अतिशय माफक दरामध्ये उत्तम प्रकारचे कपडे वापरण्यास मिळत आहेत. केवळ मुंबई शहरातून सुरू झालेला हा व्यवसाय आज भारतभरातील २० शहरांपर्यंत पोहोचला आहे. आणि या शहरांमधली उलाढाल ही पहिल्या दोनच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
व्यवसायाची इतकी झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी मार्केटिंगसाठी लावलेले कौशल्य. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या ड्रेसेस साठी ग्राहक म्हणून सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना निवडले. उत्तम गुणवत्ता आणि माफक दर यामुळे हे ग्राहक संतुष्ट झाले व तसेच त्यांच्याकडून व्हिडिओ बाईट घेतले. आणि त्याच बाइक्स पुढे मार्केटिंगसाठी वापरल्या. यासोबतच प्रत्येक शहरातील नामवंत व ख्यातनाम व्यक्तींची निवड त्यांनी केली. अशा व्यक्तींना सुरुवातीला मोफत सेवा पुरवली त्यांच्याकडून केवळ सेलिब्रिटीज प्रमाणेच बाईट्स घेतले. आणि या सर्व बाईट्स पसरविण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला.
केवळ मार्केटिंगचं नव्हे तर त्यांनी आपल्या गुणवत्तेवर देखील तितकेच लक्ष दिले. प्रत्येक शहरातील ग्राहक सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे एक विशिष्ट टीम उभी आहे. या टीममध्ये डिझायनर्स फिटिंग करण्यासाठी व योग्य तो ड्रेस सुचवण्यासाठी काम करतात. त्यासोबतच आयटी सिस्टम वेबसाईट आणि ऍप कुठेही बंद पडू नयेत यावर सतत लक्ष ठेवून असतात. आपल्या टीमच्या जोरावर कंपनी दिवसेंदिवस आपला व्यवसाय वृद्धिंगत करत आहे.
व्यवसायाची कन्सेप्ट इतकी भन्नाट असल्याकारणाने अनेक गुंतवणूकदार यात गुंतवणूक करण्यास तयार असून कंपनीच्या पहिल्याच वर्षात ५० कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली होती. यासोबतच सप्टेंबर २०१८ मध्ये अतिरिक्त २६ कोटी रुपयांची गुंतवणूक देखील मिळाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये मात्र रेंट इट बे या कंपनीने फ्लाय रोब ला विकत घेतले आणि त्यामुळे तांत्रिक पाठबळ व मार्केट ची व्याप्ती अधिकच वाढली आहे. याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होईल असा विश्वास कंपनीच्या नव्या मॅनेजमेंटने व्यक्त केला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!