नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर पार्क केलेल्या १० ते १२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी याआशयाचे निवेदन मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी सातपूर पोलीस ठाण्याला दिले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातपूर कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी घरासमोर पार्किंग केलेल्या भगवान मोगल यांची (एमएच १५बीडी १६०२) अल्टो गाडी, जीवन जाधव यांची टाटा तियागो (एमएच १५जी एल- ३१३९), कृष्णा बोडके यांची शेवरलेट (एचएच१४बीएक्स ४०५१) यासह विविध ठिकाणच्या चारचाकी वाहनांच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या आहे. दरम्यान, मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी सातपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. यावेळी स्वराज्य संघटनेचे पुंडलिक बोडके यांनीही निवेदन सादर केले. माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश घोटेकर यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी किसन खताळे, रवींद्र सगरे, योगेश लबडे, पुंडलिक बोडके, वैभव महिरे, सोमनाथ पाटील,विजय उल्लारे, सचिन सिन्हा, प्रवीण वाघ,कृष्णा बोडके, रंगनाथ आंधळे, अनिल महागडे, अमित मोरे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नवीन गाडीचेही केले नुकसान
सातपूर कॉलनी येथील कृष्णा बोडके यांनी मंगळवारी होंडाई कंपनीची नविन चारचाकी आय ट्वेंटी (I 20) वाहन खरेदी केले आहे. त्या नवीन गाडीला लावलेला फुलांचा हार सुकायच्या आत त्या वाहणाची काच फोडत बोडके कुटुंबियांच्या आनंदात विरजन टाकण्याचा प्रकार घडला आहे.
अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
दर तीन चार वर्षांनी परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत नागरिकांमध्ये दहशत पसरवली जात आहे. अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करत त्यांच्या वेळीच मुस्क्या आवळल्या पाहिजे. टवळखोरांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडू.
-सलीम शेख, मा. नगरसेवक