सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात बेमोसमी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने काल मंगळवार दि.२३ रोजी जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी परिसरातील शेतकर्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल दुपारनंतर जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी भागात बेमोसमी पाऊस, वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने शेतीपिकांचे १०० टक्के नुकसान झाले. अनेक ग्रामस्थांचे घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वीज महावितरणचे तब्बल ८० ते ९० खांब आणि ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाले. शेळ्या, गायी मृत्यूमुखी पडल्या असून, अनेक ठिकाणी शेतातील झाडेही उन्मळून पडले आहेत. तसेच, चाळीत कांदा भरत असताना उघड्यावर पडलेल्या कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. जुनी शेमळी येथील प्रशांत बच्छाव यांच्या गोठ्याचे आणि डाळिंब बागेचे, भाऊसाहेब बच्छाव यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती खचल्या.
यावेळी जीवितहानी टळली मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुरतीराम शेलार यांच्या दीड एकर डाळिंबाचे नुकसान झाले असून रत्नाकर बच्छाव यांची कांदा चाळ उध्वस्त होऊन सर्व कांदे ओले झाले आहेत. राजेंद्र खैरणार यांची गाय मृत्यूमुखी पडली असून तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले. वसंत खैरणार यांची पाचटाची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नवी शेमळी येथील बाबुलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे दूरवर उडाले. तर जुनी व नवी शेमळी परिसरातील वीज वितरण कंपनीचे अनेक खांब जमीनीवर अक्षरशः वाकले आहेत.
संजय चव्हाण यांचा पाहणी दौरा
माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी आज सकाळी या भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांचे सांत्वन केले. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनास तात्काळ प्रस्ताव सादर करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे त्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या मदतीने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. यावेळी सरपंच कल्पना शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, जनार्दन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल बच्छाव, भाऊसाहेब बच्छाव, टी.एन.वाघ, के.सी.वाघ आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बागलाणला भेट देऊन आठ दिवसात मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाकडून अद्यापही शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील बळीराजाचे होत्याचे नव्हते झाले असताना शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र शेतकर्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. येत्या निवडणुकांमध्ये या सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवून देतील. एकवेळ विकासाची कामे बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना आधी मदत करा.
Satana Taluka Unseasonal Rain Hailstorm Crop Loss