मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या १ हजार ०३४ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. सुरुवातीला ईडी कोठडी सुनावल्यानंतर पीएमएलए विशेष न्यायालयाने राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे ईडीचा ससेमिरा सुरू असून, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी आज न्यायालयात झाली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊत यांना हजर करण्यात आले. यावेळी राऊत यांनी त्यांच्यावरील विविध आरोपांचा खुलासा केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज आर्थर रोड कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली. मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रार मान्य नाहीत. राजकीय आकसाने या तक्रारी केल्या आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे. माझा आवाज दाबण्यासाठी असे गुन्हे दाखल केले आहेत, असा युक्तिवादही राऊत यांच्या वतीने करण्यात आला. मिरा-भाईंदर महापालिकेच्या शौचालय बांधणीमध्ये गैरप्रकार झाला असून, सोमय्या यांनी सुमारे १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच समाजमाध्यमावरही याबाबत पोस्ट केल्या आहेत.
याविरोधात मेधा यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात राऊत यांना कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. राऊत यांना हा गुन्हा मान्य आहे का, असे दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी विचारले. त्यावर, या खटल्यात दोषी नसल्याचे राऊत यांनी न्यायालयात सांगितले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राऊत यांना काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. राऊत यांनी केलेले आरोप आधारहीन आहेत; मात्र या विधानांमुळे आणि प्रसिद्धीमुळे आमची, आमच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे, असे मेधा यांनी याचिकेत म्हटले आहे. तर, राऊत यांनी दोषी नसल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयानेही याची नोंद घेत पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला ठेवली आहे. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात लवकरच खटला सुरू होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई सुरू करून त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सुरुवातीला संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. याचवेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट काढावे, अशी विनंती मेधा सोमय्या यांच्यातर्फे शिवडी महानगर न्याय – दंडाधिकारी न्यायालयात करण्यात आली होती.
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावर आरोप निराधार असल्याचे सांगितले. वकिलांशी चर्चाही करायला मिळाली नाही. संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी करत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश पूर्वी दिले होते.
संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडींतर्गत आर्थर रोड तुरुंगात असल्याचे मेधा सोमय्या यांचे वकील सनी जैन यांनी सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांना ‘व्हीसी’द्वारे हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तुरुंग प्रशासनाने राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले.
दरम्यान, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभालीच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात सोमय्या कुटुंबीयांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे, असा आरोप करून राऊत यांनी माझी मानहानी केली, असा दावा करत मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
Sanjay Raut Clarification on Various Allegations
Shivsena MP Medha Somaiyya Kirit Somaiyya
Court Legal Hearing Patra Chawl Money Laundering