मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्ग साडेचार तासात शिर्डीला पोहोचवतो, याचा आनंद ज्यांच्याकडे स्वतःची चारचाकी आहे त्यांना तर झालाच होता. शिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन विकास महामंडळालाही झाला होता. याच आनंदाच्या भरात नागपूर ते शिर्डी बस सेवा सुरू करण्यात आली. पण आता तीनच महिन्यात ही सेवा बंद करण्याची नामुष्की महामंडळावर आली आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे वेळ वाचणार असला तरीही त्याचे तोटेही अनेक आहेत. अनेकांना वेगाने गाडी पळविण्याची सवय नसतानाही ते प्रयत्न करतात आणि त्यात अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच कमी वेळात शिर्डी पोहोचता येईल म्हणून एसटी महामंडळाने १३०० रुपये तिकीटात बस सेवा सुरू केली. याला लोकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महामंडळाला होता. त्यानुसार सुरुवातीला प्रतिसादही मिळाला.
११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मार्गाने नागपूर ते शिर्डी प्रवासही केला. त्यामुळे समृद्धीचा चांगलाच गाजावाजा झाला. अशात उत्साहाच्या भरात एसटी महामंडळाने नागपूर ते शिर्डी बस सेवा सुरू केली. सुरुवातीला आसन क्षमतेच्या ४१ टक्के, जानेवारीमध्ये १३ टक्के, फेब्रुवारीत आठच टक्के प्रवाश्यांनी एसटीने शिर्डीचा प्रवास केला. हळूहळू हा मार्ग आपल्यासाठी समृद्धीचा नाही तर तोट्याचा आहे, असे लक्षात आल्यावर नागपूरच्या एसटी नियंत्रकांनी महामंडळ व्यवस्थापनाकडे ही बस सेवा बंद करण्याची मागणी केली आहे.
एकही प्रवासी नाही
समृद्धी महामार्गाने एसटीत बसून शिर्डीला जाण्याचा मोह हळूहळू ओसरत गेला. कारण या मार्गाने काही भीषण अपघातही लोकांनी अनुभवले. अशात बरेच दिवस तर एसटीला एकही प्रवासी मिळाला नाही. त्यामुळे ही सेवा बंद ठेवावी लागली आहे.
आधीच तोट्यात
एसटी महामंडळ बारा महिने चोवीस तास तोट्यात सेवा देणारी यंत्रणा आहे. त्यात समृद्धी महामार्गाकडून अपेक्षा होती. पण इथे तर अनेकदा डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी बसमध्ये चढायचे नाही. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला ही सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
Samruddhi Mahamarga ST Bus MSRTC Service