बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर एका कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार गतिरोधकाला धडकून उलटली. त्यामुळे कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळची आहे. प्रथमदर्शनी, कार अपघाताचे कारण टायर फुटल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक हा अपघात शिवनी पिसा गावाजवळ कारचा अपघात झाला. मारुती इर्टिगा या कारमध्ये एकूण १३ जण होते. हे सर्वजण शेगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. बुलढाण्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील गतिरोधकाला धडकून उलटली.
या अपघातात एक पुरुष, चार महिला आणि एका तरुणीसह सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले असून, त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी आणि मृत हे छत्रपती संभाजीनंगर शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर या सर्वांना जवळपास तासभर कुठलीही मदत मिळाली नसल्याचेही सांगितले जात आहे.
प्राथमिक तपासात कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. समृद्धी एक्सप्रेसवेवर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यानचा हा महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा आहे. हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे, ज्यामध्ये १७ अंडरपास बांधण्यात आले आहेत. हा द्रुतगती मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, जालना आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून जातो.
Samruddhi Highway Accident 6 Death 7 Injured