नाशिक – अमेरिकेतील टेनेसी राज्यातील सिटी ऑफ म्यूझिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशविल येथील टेनेसी मराठी मंडळ यांनी संमेलन गीत, संगीताचे विशेष कौतुक करत संगीतकार संजय गीते आणि कवी मिलिंद गांधी या जोडीला विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. या अमेरिका स्थित मराठी मंडळाच्या अध्यक्ष सौ पूनम शिरवळकर आणि नॅशविल येथील रहिवासी कवी, समन्वयक योगेश नेर यांनी ही माहिती दिली आहे. या गीताचा ऑडिओ, व्हिडीओ या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत गेलो पाहता पाहता आम्हा सर्वांना या गीताने मंत्रमुग्ध करून टाकले. माय बोलीची ही बहारदार संगीतमय कलाकृती महाराष्ट्राची ओढ लावून गेली आपल्या मातीचा सुगंध आम्हाला या गीताने दिला असे त्यांनी सांगितले. युट्युबवर संमेलन पाहण्याचा ही आनंद घेतल्याने त्यांनी संजय गीते, मिलिंद गांधी यांच्या सोबत संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक-समीर भुजबळ या सर्वांचे ही अभिनंदन आणि कौतुक केले.