सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संभाजी भिडे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी ते मंत्रालयाच्या आवारात असताना एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी तू आधी कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री भारतमातेचे रुप आहे. भारत माता विधवा नाही, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. मात्र, त्याच भिडे यांनी आता पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला निवेदन दिले. पण, या महिला पोलिसाने कुंकू किंवा टिकली लावलेली नव्हती. त्यामुळे भिडे यांनी त्यांच्याच विचारांशी फारकत घेतली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यानंतर संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर बरीच टीका झाली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली होती. तसेच या वाक्यावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आले. सर्व स्तरातून पडसाद उमटले होते. संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर भिडे असून ते मुळ सांगलीचे आहेत, त्यांचे वय सध्या ८० आहे. तसेच त्यांची भिडे गुरूजी म्हणूनही ओळख आहे. त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली. तत्पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.
संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी ‘टिपू सुलतानची जयंती साजरी करणे बंद करावे, या आशयाचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांना सादर केले. त्यावेळी मनीषा यांनी कुंकू लावले नव्हते. पण त्यांनी त्यांना निवेदन नम्रपणे दिले. त्यांनी कुंकू नसतानाही मोठ्या आदराने त्यांच्याशी भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. प्रत्येक हिंदू महिलेने कपाळावर टिकली किंवा कुंकू लावले पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांनी आता कसे नम्रपणे निवेदन दिले अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यांच्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक ट्विट करत संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराशी बोलणारे भिडे, टिकली न लावलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना मात्र नम्रतेने निवेदन देतात. दुटप्पीपणा आणखी कशाला म्हणतात?ते बघा. त्याच वेळी संभाजी भिडे यांच्या भेटीमुळे लेखिका सुधा मूर्ती यांचे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुधा मूर्ती यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. वादाच्या पार्श्वभूमीवर सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची भेट प्रचंड चर्चेचा विषय ठरली. या भेटीवेळी सुधा मूर्ती संभाजी भिडे यांच्या पायाही पडल्या होत्या. या कारणावरुन सुधा मूर्ती यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. अखेर या सगळ्या वादानंतर सुधा मूर्ती यांनी मौन सोडले होते. एका वयोवृद्ध व्यक्तीला भेटायचे आहे. त्यामुळे त्यांना भेटले. त्यांचे विचार काय आहेत. याचा पूर्व इतिहासही आपल्याला ज्ञात नव्हता. त्यांना मी ओळखतही नाही, असे सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले होते.
Sambhaji Bhide U Turn Women Controversy