नाशिक – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे ‘शिवप्रताप’ हे महाकाव्य पुरंदरे प्रकाशानामार्फत वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिकच्या आदर्श विद्यालय आणि एचपीटी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या चिन्मय मोघे उर्फ कवी समर यांनी नाशिक येथेच वयाच्या 16 व्या वर्षी या महाकाव्याची रचना केली आहे.
एकूण 19 वृत्तांत महाकाव्याची रचना करण्यात आली असून कवी समर यांनी रचलेल्या नव्या 2 वृत्तांचा आनंदही वाचकांना अनुभवता येणार आहे. अशा प्रकारचे मराठी भाषेतील हे पहिलेच महाकाव्य आहे. या पुस्तकात कै.दिनानाथ दलाल या सुप्रसिद्ध्य चित्रकारांची चित्रेही समाविष्ट करण्यात आली असून आतील सजावट चारुहास पंडित यांनी केली आहे. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले 3 हजार श्लोक आणि काव्यातील लयबद्धता हे महाकाव्याचे वैशिष्ट्य आहे.
कवी समर गोल्फ क्लब येथील शासकीय निवासस्थात असताना त्यांनी केवळ 50 दिवसात महाकाव्य लिहून पूर्ण केले. त्यानंतरदेखील त्यांनी मराठी भाषेतील लिखाण सुरू ठेवले असून ‘तथागत बुद्ध’ आणि ‘उर्मिला’ अशा दोन कादंबऱ्यांचे लिखाणही पूर्ण केले आहे. ‘संगीत चंद्रप्रिया’सारखे संगीत नाटक त्यांनी अथक परिश्रमाने मराठी रंगभूमीवर आणले. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी केली. त्यासाठी त्यांना बालगंधर्व संस्थेच्या कै.अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाकाव्य ’शिवप्रताप’ दोन प्रकारच्या आवृत्तीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुरंदरे प्रकाशनाच्या अमृतराव पुरंदरे यांच्यामुळे महाकाव्याची लाकडी आवृत्ती वाचकांना उपलब्ध होणार असून दुसरी जनआवृत्ती असणार आहे. महाकाव्यात छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन सहजपणे गाता येईल अशा शैलीत केले आहे. महाकाव्य रचनेचा निश्चय शाळेत असतानाच केला होता आणि त्यासाठी छत्रपति शिवराय यांच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचारही मनात येणे शक्य नव्हते. मराठी भाषेच्या सेवेसाठी आणखी लिखाण करायचे आहे, अशी प्रतिक्रिया कवी समर यांनी दिली आहे. या पुस्तकासाठी purandareprakashan.in या संकेतस्थळावर किंवा 9096083685 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
महाकाव्य शिवप्रतापची वैशिष्ट्ये
– ‘महाकाव्य शिवप्रताप’ची* पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
– ६५० पृष्ठांचा हा काव्यमय ग्रंथ आता सर्वत्र उपलब्ध आहे.
– मराठी भाषेतील १९ वृत्तांतले पहिले वृत्तबद्ध महाकाव्य.
– अगदी सोप्या मराठी भाषेत ३००० श्लोक.
– वृत्तबद्ध असल्याने गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध काव्य.
– छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र.
– पद्मविभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना.
– कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश.
– हे काव्य ‘कवी समर’ हे नाव घेऊन वयाच्या १६व्या वर्षी लिहिले.
– संपूर्ण महाकाव्य ५० दिवसांत लिहून पूर्ण केले.
– ‘पुरंदरे प्रकाशना’ने ग्रंथ प्रकाशित केला आहे.