मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासातून कथित मनी लाँड्रिंगचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दस्तुरखुद्द सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नाव नसल्याने त्यांना दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये ईडीने परब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून, दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले होते, ज्याची किंमत १० कोटींहून अधिक आहे.
परब यांनी कदम यांच्याशी मिळून स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडून केवळ कृषी जमिनीचे अकृषिक वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली आणि सीआरझेडचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले, असे ईडीने म्हटले आहे.जमिनीचा वापर कृषीवरून बिगरशेतीमध्ये बदलण्याची परवानगी मिळवण्यासाठी कदम यांनी त्याच्या पूर्वीच्या मालकाची बनावट स्वाक्षरी केली, असाही आरोप केला आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्यांचे एकूण उत्पन्न १०.२ कोटी रुपये होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रात सदानंद कदम आणि माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचे नाव आहे. तर परब यांच्या नावाचा उल्लेख नाही, हे विशेष!
Sai Resort Money Laundering Anil Parab ED Charge Sheet