इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील मराठमोळं जोडपं म्हणून रितेश आणि जेनिलीया देशमुख या दोघांचं नाव कायम पुढे येत. ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटानंतर हे दोघे एकत्र चित्रपटात दिसले नाहीत. मात्र आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. हे दोघे लवकरच एका मराठी चित्रपटात दिसणार आहे आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांची लाडकी जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
रितेश – जेनिलिया यांचा ‘वेड’हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रितेश आणि जेनिलियाने या चित्रपटाची माहिती दिली होती. आता ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमधून या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवली गेली आहे. नेहमी आपल्या विनोदाने हसवणारा रितेश यात गंभीर भूमिकेत दिसत आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्या व्यक्तीबरोबर लग्न न झाल्याने होणारी घुसमट दर्शविणारे रितेशचे पात्र आहे.
तर दुसरीकडे जेनिलिया ही रितेशवर प्रेम करणारी आहे. प्रेमासाठी या दोघांची होणारी फरफट यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील संवाद हे थेट काळजाला भिडणारे. चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय – अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकारही यात प्रमुख भूमिकेत आहेत.
प्रेम भरलेल्या ढगांसारख, मन पाऊसही मन उदासही….. या ओळी काळजात घुसणाऱ्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची एक कहाणी आहे. एक वेगळी जागा आहे. त्यामुळे त्याचं प्रेम देखील वेगळंच आहे. हे प्रेम जेव्हा वेड बनतं तेव्हा….. अशाच प्रेमाची कथा घेऊन रितेश आणि जेनेलिया देशमुख प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे.
Riteish and Genelia Deshmukh Ved Marathi Movie Trailer Out