छत्रपची संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा कर माफ होणे किंवा वारंवार भरण्यापासून सूटका होणे, .यापेक्षा मोठी समाधानाची बाब कुठली असणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील आता अकृषी कराच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. कारण आता खरेदीच्या वेळी फक्त एकदाच अकृषी कर भरावा लागणार असल्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला आहे.
एखादी सवलत किंवा योजना जाहीर करताना सरकारला एकतर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात किंवा महसुलात तुट सहन करावी लागते. एनए टॅक्सच्या बाबतीत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महसुलावर परिणाम होणार आहे. परंतु, या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी एनए टॅक्स भरणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होतो. परंतु, आता एकदा एनए टॅक्स भरल्यानंतर पुन्हा भरण्याची गरज नसेल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिवाय भूमी अभिलेख विभागाकडून दिले जाणारे मोजणीचे नकाशेही आता पंधरा दिवसांत घरपोच मिळेल, अशी ग्वाहीदेखील मंत्र्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे क्रेडाई महाराष्ट्राच्या नव्या कार्यकारीणीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
वाळूचा लिलाव बंद
वाळूचा लिलाव बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. सर्वसामान्य जनतेला वाळुखरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत असल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता बांधकाम क्षेत्राला लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासने मिळणार आहे. त्या हिशेबाने दळणवळणाचा खर्च लक्षात घेता व्यावसायिकांना एक हजार रुपये ब्रासने वाळू मिळावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यातून अवैध वाळू ठेकेदारांची साखळी तोडण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.
डिजीटल मॅपिंगची सुविधा
मालमत्तेच्या डिजीटल मॅपिंगची सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांची मॅपिंग ड्रोनद्वारे सर्वेक्षण करता यावे यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन पुरवण्यात येत आहे.
Revenue Minister Big Announcement Non Agriculture Tax