मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना त्यांच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, येत्या ३१ मार्चपर्यंत बँकांना कुठलीही सुटी नसेल. शनिवारी आणि रविवारीही बँका सुरू राहतील. बँकेशी संबंधित कामे रविवारीही करता येतील. तथापि, ३१ मार्चनंतर म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बँका नक्कीच बंद राहतील. म्हणजे एप्रिलमध्ये सलग दोन दिवस बँकेत कोणतेही काम होणार नाही. याशिवाय एप्रिलमध्ये बँकांना पाच सुट्ट्या असतील.
आरबीआयने सांगितले की, ‘२०२२-२३ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत आहे. या तारखेपर्यंत सर्व सरकारी व्यवहार पूर्ण करावेत. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालींद्वारे होणारे व्यवहार ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहतील.
आरबीआयने जारी केलेल्या आदेशानुसार, ‘सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग आयोजित केले जाईल, ज्यासाठी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स विभाग (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल. DPSS देखील RBI अंतर्गत येते. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांचा अहवाल देण्यासाठी रिपोर्टिंग विंडो ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी दुपारपर्यंत उघडी ठेवली जाईल.
१ आणि २ एप्रिल रोजी बँकांना आरबीआयने सुट्टी दिली आहे. यानंतर ४ एप्रिलला महावीर जयंती, ७ एप्रिलला गुड फ्रायडे, ८ एप्रिलला दुसरा शनिवार, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती, २२ एप्रिलला ईदची सुट्टी असेल.
हे काम ३१ मार्चपूर्वी करा
तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी १००० रुपये विलंब शुल्क आकारत आहे.
तुमच्याकडे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना खाते असल्यास, परंतु या आर्थिक वर्षात त्यात पैसे टाकता आले नाहीत, तर खाते सक्रिय ठेवण्यासाठी ३१ मार्चपर्यंत त्यात काही पैसे ठेवा. अन्यथा, ते बंद केले जाऊ शकतात.
Reserve Bank of India Order March End All Bank Timings