मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रिलायन्स जिओच्या दूरसंचार सेवेवर शनिवारी परिणाम झाला आहे. असंख्य ग्राहकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या. मात्र, एजन्सीच्या अहवालानुसार रात्री ८ नंतर दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यात आली. ग्राहकांना भेडसावणाऱ्या या समस्येमुळे कंपनीने दोन दिवसांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅनही जाहीर केला आहे.
मोबाईल वापरकर्त्यांनी सांगितले की, कॉल करताना त्यांना ग्राहक नेटवर्कवर नोंदणीकृत नाही, असा संदेश मिळत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अशा तक्रारी क्वचितच आढळतात. तसेच याचे कारण अद्याप समजलेले नाही. संध्याकाळी उशिरा ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात कंपनीने अनेक ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची कबुली दिली. या अडचणीमुळे अतिरिक्त दोन दिवसांचा ‘अनलिमिटेड प्लॅन’ही जाहीर केला. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या टीमने काही तासांत ही नेटवर्क समस्या सोडवली, परंतु आम्ही समजतो की, सेवा बंद होणे हा ग्राहकांसाठी चांगला अनुभव नव्हता आणि आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान ग्राहकांना त्यांचे फोन ‘रिस्टार्ट’ करण्याची विनंती करण्यात आली. या तांत्रिक बिघाडामुळे अनेक जिओ वापरकर्त्यांना एकमेकांशी बोलण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या कॉलिंग फीचरसारख्या पर्यायांचा अवलंब करावा लागला.