अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ग्राहकांसाठी अभिनव योजना आणली आहे. या योजनेचा लाभ ७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या काळात ग्राहकांना घेता येणार आहे. जर तुमची एलआयसी पॉलिसी बंद पडली (लॅप्स) असेल, तर ती सुरू करण्यासाठी ही अभिनव योजना आहे.
एलआयसीने नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, पॉलिसीधारक त्यांची लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात. या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेत पॉलिसी पुन्हा सुरू केल्यावर विलंब शुल्कातही सवलत दिली जाईल. मात्र, विलंब शुल्काव्यतिरिक्त कोणतीही सवलत दिली जाणार नाही. टर्म अॅश्युरन्स आणि उच्च जोखमीच्या योजनांमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. तसेच, वैद्यकीय गरजांच्या योजनांमध्येही कोणतीही सवलत नाही. आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांवरही विलंब शुल्क माफी दिली जाणार आहे. ज्या पॉलिसीधारकांची पॉलिसी लॅप्स झाली आहे त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पॉलिसीधारक वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत. त्यांच्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे.
या पॉलिसी विशेष पुनरुज्जीवन मोहिमेमध्ये पाच वर्षात कालबाह्य झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी असणार आहे. यामध्ये, १ लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमच्या पॉलिसीवर विलंब शुल्कात २० टक्के सूट दिली जाईल, जी जास्तीत जास्त २००० रुपये असू शकते. तसेच, विलंब शुल्कामध्ये १ ते ३ लाख रुपयांच्या प्रीमियममध्ये २५ टक्के सूट मिळेल, जी जास्तीतजास्त २५०० रुपये असू शकते. ३ लाख रुपयांवरच्या पॉलिसीवर ३० टक्के सूट मिळेल, जी कमाल ३ हजार रुपये असू शकते. मायक्रो विमा पॉलिसीमध्ये १०० टक्के विलंब शुल्कावर सवलत मिळणार आहे. ज्या पॉलिसी प्रीमियम भरण्याच्या मुदतीत आहेत आणि ज्या पॉलिसीची मुदत पूर्ण झालेली नाही, त्या पॉलिसीधारकांनाच ही १०० टक्क्यांची सवलत मिळणार आहे.