इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या आधुनिक काळात अनेक जण एकमेकाला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, यामध्ये कोण वरिष्ठ किंवा कनिष्ठ, तसेच जात, धर्म, पंथ, वर्ग, लिंगभेद असा कोणताही भेदभाव नसतो. मात्र अद्यापही काही ठिकाणी समाजामध्ये अनेक प्रकारचे भेदभाव पाळले जातात. त्यातून स्त्रियांविषयीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने भेदभाव पाळल्या जातात, त्यातूनच मग एखाद्याने मुलगी किंवा महिलेला सोशल मीडियावर काही मेसेज पाठवला तर त्याचा वेगळाच अर्थ काढला जातो, अर्थात मेसेज पाठवणणाऱ्या व्यक्तीने याचे भान ठेवले पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम होतात, राजस्थानमध्ये असाच एक प्रकार घडला. शिक्षकाने विद्यार्थिनीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे निमित्त झाले. त्याच्या तोंडाला चक्क काळे फासून त्याला मारहाण करण्यात आली, या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर विभागातील एका गावातील आहे. तेथील सरकारी शाळेचे शिक्षक राजेश कुमार यांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. या शिक्षकावर एका विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा आरोप असून तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. हा प्रकार कुटुंबीय व ग्रामस्थांना समजताच ते संतप्त झाले. त्यांनी शाळेत पोहोचून शिक्षकाला पकडून तोंडाला काळे फासले, त्यानंतर बेदम मारहाण केली. असा प्रकार ग्रामीण भागात कोणालाही चालत नाही, त्यानंतर त्याचा व्हिडिओही बनवण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
शिक्षण विभागाने घेतली दखल
याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. शिक्षण विभागाने त्याची चौकशी करण्यासाठी विभागीय चौकशीची स्थापना केली आहे. शिक्षण विभागाने महिलांसह दोन मुख्याध्यापकांची समिती स्थापन केली आहे. आता सदर समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. शिक्षकाची खरेच चूक होती का? हे देखील तपासले जात आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर शिक्षक राजेश कुमार यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात करत आहेत. आता या प्रकरणांमध्ये काय निष्कर्ष निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rajasthan School Teacher Girl Student Molestation Police Education