गणेशोत्सव विशेष…
तुज नमो…
गणपतीपुळे…
अशी आहे या गणरायाची महती…
गणपतीपुळे स्थानाची महती पुराणकाळापासून आहे. हे मंदिर समुद्राच्या अगदी काठावर आहे. संकटनाशक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपतीला गणपती स्तोत्रातील पाचवे लंबोदर स्थान लाभले आहे. मुदगल पुराणात याचा उल्लेख २१ प्रसिद्ध गणपती स्थळात आहे. हे ठिकाण रत्नागिरीपासून ३५ किमी दूर आहे. श्रीगणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओमकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्रीगणेश ही देवता ओमकार रुप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकाररुपात आणणारी अनेक प्राचिन मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक!

मो. ९४२२७६५२२७
या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला दृष्टिला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य! सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.
पौराणिक स्थान
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेच्या लंबोदर गणेशाचा उल्लेख योगीन्द्र विजय ग्रंथातील (१. १. १.) पोथीत मंगळ ध्यानात व मुदगल पुराणातही – पश्चिमेचा रक्षक द्वार देवता म्हणून पुढील प्रमाणे आहे –
कोकणी प्रसिद्ध रत्नागिरी । यत समीव महाक्षेत्र गणपती ।
पुळे नाम प्राकृती मूळ स्थान तरी । अष्टविनायक ‘क्षेत्रगत’ ।
कांधासुर शांतिद श्रीलंबोदर । पश्चिमांत दिगंती जो प्रतिष्ठेतसाट ।
श्री मौकुती हे सिद्ध महाक्षेत्र । प्रांताधिष्ठताला त्या नमितो ।
गणपतीपुळे स्थानाची महती पुराणकाळापासून आहे. हे मंदिर समुद्राच्या अगदी काठावर आहे. संकटनाशक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपतीला गणपती स्तोत्रातील पाचवे लंबोदर स्थान लाभले आहे. मुदगल पुराणात याचा उल्लेख २१ प्रसिद्ध गणपती स्थळात आहे. हे ठिकाण रत्नागिरीपासून ३५ कि. मी . दूर आहे.
अख्यायायिका
देवस्थानाचा उल्लेख ३४०० वर्षांपासून आढळतो. पुळे या लहान खेड्यात बाळभटजी भिडे रहायला आले. त्यांना दृष्टांत झाला – भक्तांची कामनापूर्ती करण्यासाठी मी गणेशगुळे (पावस जवळील) येथून या पवित्र क्षेत्री दोन गंडस्थळे व दंतयुक्त असे रूप धारण करून या डोंगरात आलो आहे. तू माझी पूजा–अर्चा–उपासना कर, तुझ्या गावावरील सर्व संकटे दूर होतील. माझे निरंकार स्वरूप याच कैवल्याच्या बनात म्हणजे डोंगरात आहे. दृष्टांताप्रमाणे भिडे गुरुजी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. दरम्यान, डोंगराच्या पायथ्यावर, समुद्राच्या काठावरील केवड्याच्या वनात एक गाय फिरत असताना एका ठिकाणी उभी राहिली. तिच्या आचळातून दुधाच्या धारा झरू लागल्या, त्या धारा गाईच्या पायाजवळ असलेल्या लहान शिळेवर पडत होत्या. ती गाय भिडे यांचीच होती. गुराख्याने हे पाहिले आणि भिडे यांना सांगितले. सर्वांना आश्चर्य वाटले कारण ती गाय भाकड होती. दूध देत नव्हती! लोकांनी त्या शिलाखण्डाची पूजा केली. शेंदूर चर्चित केला तेच ठिकाण आजचे गणपतीपुळे!
त्याचवेळी पावसजवळील गणेशगुळे मंदिरातील पाण्याचा झरा बंद झाला म्हणून ‘गुळ्याचा गणपती पुळ्यास आला’. अशी म्हण प्रचलित झाली. भिडे यांनी तिथे डोंगराच्या पायथ्याशी मंदिर बांधून पूजा सुरू केली. मंदिराच्या मागील टेकडीचा रस्ता मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. टेकडीला फेरा मारला की भक्त पुन्हा मंदिरात पोहचतो. असे सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गणेशाचे दर्शन घेतले होते. मंदिराची धर्मशाळा आणि नंदादीप श्रीमंत रमाबाई पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे. मंदिराबाहेर ११ दीपमाळा असून कार्तिक पौर्णिमेला गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि लागूनच असलेला अरबी समुद्र यामुळे हे मंदिर पर्यटकांचे आणि भक्तांचे आवडते ठिकाण बनलेले आहे.
येथील गणपतीचे मंदिर हे डोंगराला लागून असल्याने, मंदिराला प्रदक्षिणा घालयाची असेल तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. या टेकडीचा परीघ साधारण हा एक किलोमीटर अंतरचा आहे. हा प्रदक्षिणामार्ग असंख्य झाडाझुडपांनी वेढलेला आहे. आरबी समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे हा मंदिर परिसर अतिशय विलोभनीय झाला आहे. गणपतीपुळे येथे समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने पर्यटन आणि पुण्य या दोन्हीची सांगड घालता येते. गणपतीपुळे येथील समुद्र किनारा अतिशय स्वच्छ व निळ्याशार पाण्याचा असल्याने पर्यटकांची गर्दी वर्षगभर असते. मुख्यतः सुट्ट्यांमध्ये पर्यटक गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
मूषकाचे वैशिष्ट्य
मंदिराच्या आत शिरतांना बाहेर एक भलमोठा मोठा मूषक नजरेस पडतो. या मूषकच्या कानात भाविक आपली इच्छा सांगतात. भाविकांची अशी मान्यता आहे की, मूषकाच्या कानात आपली इच्छा सांगितली की ती पूर्ण होते. मंदिर परिसरात अनेक दुकाने आहेत. यामध्ये लाकडी खेळणी, विविध आकारातील गणपतीच्या मूर्ती, पुजा साहित्य विकणारे यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सोबत समुद्र किनार्यावर नारळ विकणारे व समुद्राचा फेरफटका मारण्यासाठी मोटर बोट, पारंपरिक होडी मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून येथे दुपारच्या आरतीनंतर आणि संध्याकाळी आरतीनंतर प्रसादाचे वाटप केले जाते. यात खिचडी भात, शिरा, साबुदाणा खिचडी आदींचा समावेश असतो.
गणपतीपुळे नाव कसे पडले
यासंदर्भात येथे एक कथा सांगितली जाते. फार वर्षापूर्वी गणपतीपुळे या गावात मोठी वस्ती नव्हती. कालांतरणे वस्ती निर्माण झाली. परंतु गावाच्या उत्तर बाजूला गणपतीपुळेच्या पश्चिम दिशेने उतरण असल्याने बराचसा भूभाग हा पुळणवट आहे. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे गणपती आणि पुळणवट भाग असल्याने या गावाला अशा सामाईक शब्दाने ओळखले जाऊ लागले, अशी माहिती स्थानिक सांगतात.
गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू ही कल्पना फक्त आद्य देवतेलाच साजेशी आहे. स्वयंभू देवता या सृष्टीचाच एक भाग असतात. त्यांना साकार रुपात आणावे लागत नाही. स्थापत्य म्हणून अथवा मूर्ती म्हणून घडवावे लागत नाही. सृष्टीच्या जन्मकाळीच त्यांचा जन्म झालेला असतो. अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू स्थानाचे दर्शन घेणे ही एक अत्यंत रोमहर्षक स्थिती असते. श्रीगणेशाला साकार रुपात आणण्याचा प्रयत्न गेले हजारो वर्षे भाविकांनी आणि कलावंतानी केला आहे. गणपतीपुळे येथील स्वयंभू रुप या कल्पनांचे एक सामान्यीकरण आहे. याची साक्ष दर्शन घेताना आपल्याला पटते.
प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचा नमूना
श्री गणेशस्वरुप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्रसपाटीला समांतर आहे. साक्षात्कार झाल्यानंतर हे स्थान जणू पुन्हा प्रकट झालं. पाचशे वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना या साकार रुपाचा दृष्टांत झाला. त्यांनीच केंबळी (गवताचं) छप्पर उभारुन पहिली पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव आण्णाजी दत्तो यांनी केंबळी छप्पराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढविला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली. तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. आज दिसणाऱ्या मंदिराचं बांधकाम सन १९९८ ते २००३ या कालावधीत सुरु होतं. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. एकाच दगडातून कोरुन काढल्याचा भास व्हावा, असं रेखीव बांधकाम रेड आग्रा या खास पाषाणातून उभं राहिलं आहे. या जागेची नैसर्गिक ठेवण मुळातच एक उत्तम प्राकृतिक आविष्कार आहे. उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभामंडपावरील नक्षीदार छप्पर संधी प्रकाशात डोळ्याचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्ही बाजूला पाच त्रिपूरं आहेत. त्रिपूरी पौर्णिमेला जेव्हा त्यावरील दिवे प्रकाशमान होतात तेव्हा मंदिराची रोषणाई आपल्याला दिपवून सोडते.
सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूयार्स्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणचं दर्शन घेतात. तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरणस्पर्श करतात. मंदिरामागचा डोंगर स्वयंभू म्हणून संरक्षित आहे. या स्वयंभू स्थानाला प्रदक्षिणा म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा. डोंगराभोवतीचा हा प्रदक्षिणा मार्ग जांभ्या दगडानी बांधून घेतला आहे. प्रदक्षिणा मागार्वरुन होणारं सागर दर्शन हा सुद्धा आल्हाददायक अनुभव असतो.
कसे जावे
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एसटी) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. राज्य परिवहन मंडळ यांच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. गणपतीपुळे ते मुंबई हे अंतर ३७५ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरून गेल्यास निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की, साधारण ३२ किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन राज्य परिवाहन मंडळाची एशियाड बस सेवा आहे. रत्नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक आहे. रत्नागिरी आगारातून दर १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असतात.
गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाददायक आहे. गणपतीपुळे हे कोकणातील पर्यटनाचे प्रमुख ठिकाण असल्याने दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. मग केव्हा येता गणपतीपुळेला
(छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)