मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जेवणात लोणचे म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते, लोणच्यामध्ये लोणच्यामध्ये कैरीचे, मिरचीचे, काकडीचे लिंबूचे, हळदीचे याशिवाय अन्य पदार्थांचे देखील लोणचे तयार करतात. परंतु बहुतांश घरांमध्ये कैरीच्या लोणच्यालाच पसंती दिली जाते. मात्र पावसाळ्यात लोणचे टिकवणे ही गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते, कारण पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे लोणच्याला बुरशी लागू शकते, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
लोणचे हा भारतीय खाद्यपदार्थाचा महत्त्वाचा भाग आहे. जेवणासोबत थोडं लोणचं संपूर्ण जेवणाची चव वाढवते भारतीय घरांमध्ये, अधूनमधून भाजी नसेल तर लोणची पराठ्यासोबत किंवा साध्या चपातीसोबत खातात. एकदाच जास्त लोणचे बनवल्यास नंतर ते बराच काळ वापरता येते. परंतु ते पावसाळ्यात योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे.
लोणचे तयार करण्याच्या मसाल्यासाठी लाल मिरची ,मोहरी डाळ, हिंग ,मीठ , हळद ,बडीशेप, लवंग, विलायची, धने आदि प्रकारचा मसाला लागतो. त्यानंतर कैऱ्या फोडून घ्याव्या लागतात. बाजारात कैऱ्या फोडण्याचे दर देखील वाढले आहेत. गरम तेलात टाकुन कैरीच्या फोडीला मसाला लावून मातीचे मडके किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे लोणचे अधिक चवदार बनते .
आपण लोणचे हे पोळी, खिचडी, भात, पराठ्यासोबत खाऊ शकतो. मात्र काही वेळा ते खराब होते, विशेषत: पावसाळ्यात सततच्या पावसामुळे वातावरण ओलसर राहते आणि आपली एक छोटीशी चूक लोणचे खराब करू शकते. काही वेळा ओल्या हातानं बरणीला स्पर्श केल्यास लोणचे खराब होऊन त्यात बुरशी येऊ लागते. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही समस्याही दूर होऊ शकते.
लोणचं बनवून कधीच प्लास्टीकच्या बरणीत भरू नका. लोणचे काचेच्या बरणीत ठेवावे. लोणचे प्लॅस्टिक किंवा इतर धातूवर प्रतिक्रिया देऊन कडू होतात. म्हणून नेहमीच काचेच्या बरणीत ठेवा. तसेच काही गृहीणी कमी तेलात लोणचे बनवतात, कारण त्यांना वाटते की जास्त तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तेल आणि मीठ एक प्रकारे संरक्षक म्हणून काम करतात. लोणच्यामध्ये भरपूर तेल टाकावे.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे बरण्या खराब होतात. कधी कधी लोणच्याच्या घट्ट डब्यातही ओलावा येतो. त्यामुळे तुमच्या लोणच्याच्या डब्याचे झाकण घट्ट बंद असल्याची खात्री करा. जर ओलावामुळे लोणचे खराब करेल, असे वाटले तर झाकण कागद किंवा कापडाने बंद करा. झाकण लावण्यापूर्वी, वर स्वच्छ कागद किंवा कापडाचा तुकडा ठेवा आणि नंतर ते लावा.
बरणीतून लोणचे काढण्यासाठी बरेच जण चमचा वापरतात, पण लोणच्यामध्ये चमचा घातल्यानंतर काढायला विसरतात. असे केल्यानेही लोणचे खराब होते. चमचा स्टीलचा असेल तर त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. त्याच वेळी, जेव्हा लोणचे बाहेर काढाल तेव्हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. स्वच्छ हाताने आणि चमच्याने लोणचे काढून घ्या. चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा लोणचाची बरणी एकदा उन्हात ठेवावी. यामुळे लोणचे जास्त काळ टिकेल, आणि जेवणाची चव वाढेल.
Rainy Season Mango Pickle Storage Precaution Tips