इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीवीरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे पण, महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आज गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपच्या तालिबानी वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केले तर भाजपाचा खासदार अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान रक्षणाची भाषा करणारे, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणारे आमचे नेते राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा आता भाजपचे राज्यसभा अनिल बोंडे यांनी केली आहे. महायुती मधील नेत्यांची तोंडाची गटार बंद होत नाही. एका मागून एक महायुतीचे नेते आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधींनी घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राजकीय चटके बसत आहेत. म्हणूनच खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड नैराश्यामुळे राहुल गांधी बद्दल अशी भाषा वापरत आहे.
तीन दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडला अजून अटक झालेली नाही म्हणूनच अनिल बोंडेची हिंमत वाढली आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल गल्लीतले आमदार अशी भाषा करतात तरी राज्यातील – देशातील पोलीस प्रशासन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाही. राज्याचे पोलिस प्रशासन गुंडगिरीची भाषा करणाऱ्या महायुतीतील नेत्यांबद्दल कारवाई कधी करणार? असा प्रश्न केला आहे.