नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये आज पहाटे 04.35 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले आहेत. स्टेशन क्विक रिअॅक्शन टीम्स सक्रिय करण्यात आल्या होत्या. संपूर्ण परिसर नाकाबंदी करून सील करण्यात आला. सर्च ऑपरेशन सुरू आहे. भटिंडा येथील आर्मी कॅन्टचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे देखरेख केली जात आहे. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भटिंडा मिलिटरी स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या गोळीबारात चार जवान शहीद झाले आहेत. या प्रकरणाची माहिती जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पंजाब पोलिसांना छावणीबाहेर थांबवण्यात आले आणि लष्कराची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंटमधील घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दोन दिवसांपूर्वी भटिंडा मिलिटरी स्टेशनच्या गार्ड रूममधून इन्सास रायफल चोरीला गेली होती. आजची घटना त्याच्याशी जोडली जात आहे.
या गोळीबारामध्ये चालक एम.टी.संतोष, चालक एमटी कमलेश, चालक एमटी सागरबान, तोफखाना योगेश कुमार यांनी प्राण गमावले आहेत. मिलिटरी स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारावर भटिंडा एसएसपीचे वक्तव्य आले आहे. लष्करी ठाण्यावर झालेला गोळीबार ही दहशतवादी घटना नाही, असे ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी भटिंडा मिलिटरी स्टेशनमधून मॅगझिनसह एक इन्सास रायफल बेपत्ता झाली होती. हरवलेल्या शस्त्राचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर भटिंडा कँट पूर्णपणे सील करण्यात आले असून कँट पोलिसांसह पंजाब पोलिसांनी कँटकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कॅन्टच्या आतील जंगलातून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. ज्याला कुत्र्यांनी ओरबाडून खाल्ले होते. मृत हा लष्कराचा शिपाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
खालसा सजना दिनानिमित्त भटिंडा येथील तलवंडी साबो येथे दोन दिवसांनी लाखो शीख जमा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भटिंडामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांचा पहारा होता. अशात गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. बुधवारी पहाटे ज्या भागात गोळीबार झाला तो भाग तळवंडी साबोपासून अवघ्या 35 किमी अंतरावर आहे.
https://twitter.com/ashoswai/status/1646056896942440448?s=20
Punjab Bhatinda Military Station Open Fire 4 Jawan Killed