मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल रात्री भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेली ही बैठक तब्बल सव्वा तास चालली. यावेळी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव यांनी अचानक घेतलेल्या या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. या बैठकीत नक्की काय चर्चा झाली, याविषयी आता खुद्द पवार यांनीच माहिती दिली आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर सुमारे सव्वा तास चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढू या, तसेच इतर मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते, तसेच भारतीय संविधानाच्या विरोधात जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आपण लढायचे. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे गौतम अदानीच्या जीपीसी चौकशीवर विरोधी पक्षांपेक्षी वेगळी भूमिका मांडून शरद पवार राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या पदवीवरूनही ठाकरे व इतरांनी भाष्य केल्याने फटकारल्याने, महाआघाडीत बेबनाव सुरू असल्याचे म्हटले जात होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. त्यातच गौतम अदानी यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आल्यावर महाविकासआघाडीबाबत चर्चांना उधाण येऊन आता फार काळ ही आघाडी टिकणार नाही? अशी चर्चा केली जात होती, विशेषतः भाजपानेही मविआ टीकणार नाही, असा दावा केला. त्यामुळे पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर स्वतः शरद पवारांनी मत मांडले आहे.
मुंबईहून आज पुणे येथे आले असता शरद पवार म्हणाले की, काही मुद्द्यांवर वेगळी मते असली, तरी सध्या महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत, त्या सर्वांनी एक विचाराने काम करावे, अशाप्रकारची आमची चर्चा झाली. त्याप्रमाणे काही समान कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे हे धोरण आमचे ठरले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, अदानी किंवा मोदींची पदवी यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असल्याच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून आगामी निवडणुकांना संयुक्तपणे सामोरे जाण्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत भर देण्यात आला. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची युती झाली असली तरी वंचितला महाविकास आघाडीत प्रवेश देण्याबाबत सहमती होऊ शकली नाही. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वेगळ्या भूमिकेवर दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी शरद पवारांनी बोलावे, असा निर्णय झाल्याचे कळते.
पवार नक्की काय म्हणाले त्याचा हा व्हिडिओ
माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी काल आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीबद्दल माध्यमांशी बोलताना पवार साहेब म्हणाले की, "काही प्रश्नांबद्दल वेगळी मतं असली तरी आम्ही एकत्र काम करतो. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांनी एका विचाराने काम… pic.twitter.com/KWQ2A4EBXs
— NCP (@NCPspeaks) April 12, 2023
Politics Uddhav Thackeray Sharad Pawar Meet