पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याच्या मानात आणखी एक तुरा लावण्यासाठी मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरी महिला रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीसाठी 9 मार्चला निघणार असून सुमारे 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्यामाध्यमातून बनविण्यात आलेले विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशा पर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.
रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार रमिला लटपटे 9 मार्च 2023 रोजी सांयकाळी 4.30 वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्विनी जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच ह्या जगभ्रमंतीचा घाट घातला आहे. काही दिवसापुर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती,या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक ही केले होते. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.
Pune Young Girl Bike World Tour Record