पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा यांचा मनोहरी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल सांस्कृतिक महोत्सव यंदा ३४ वे वर्ष साजरे करत आहे.पुणे फेस्टिव्हल यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणार असून याचे उद्घाटन दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी ही माहिती दिली. यावेळी फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉक्टर सतीश देसाई, पी इनामदार हे उपस्थित होते.
कृष्णकुमार गोयल म्हणाले की, या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. या सोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हे देखील याप्रसंगी उपस्थित राहतील. अभिनेते सुनील शेट्टी उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील. यंदा पुणे फेस्टिव्हल मध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्यविभूषण शिवकुमार शर्मा, पद्धविभूषण अभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, अभिनेत्री नृत्यांगना, खासदार हेमामालिनी यांचा ‘गंगा बले’ अशोक हांडे यांचा ‘आजादी 75 तथा आजादी का अमृत महोत्सव’ हे कार्यक्रम होणार आहेत.
शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफिल आणि मीस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होतील. याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बालगंधर्व कलादान येथे महिलांची चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन येथे उगवते तारे, इंद्रधनु आणि हॉटेल तरवडे कलर्स येथे महिलांची पाक कला स्पर्धा, जपानी व मंगळागौरी खेळ यासोबतच पुणे शहरात विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.
राज्याचे पर्यटन व पर्यावणमंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तसंच अभिनेता सुनील शेट्टी यांचीही उपस्थिती या सोहळ्यात असेल. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये हेमामालिनी यांची गणेश वंदना होईल. पुण्यातील ज्या गणेश मंडळांना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा गणेश मंडळांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे, तशी माहिती आयोजकांनी दिली. शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रिडा मंच, नेहरू हॉल, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी पुणे फेस्टिव्हल नागरिकांसाठी विनामूल्य असेल, असंही आयोजकांनी सांगितल आहे. या फेस्टिव्हलची सांगता 9 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे मुख्य संयोजक सतीश देसाई यांनी दिली.
पुणे फेस्टिव्हलही मूळ संकल्पना काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची होती. कलमाडी यांनी आपल्या काळात पुणे फेस्टिव्हलचा दर्जा आणि चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. मात्र, पुणे कॉमनवेल्थ गेम घोटाळ्यात कलमाडी यांचं नाव आलं आणि त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. तेच कलमाडी तब्बल एका दशकानंतर 5 ऑगस्टला पुणे महापालिकेत आले. एकेकाळी राजकारणात दरारा असलेल्या कलमाडींना आज ओळखणही अवघड झाले होते.
Pune Festival 2022 Details Attraction Guest Performances