पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात विद्यमान आमदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून आणण्याचे राजकीय संकेत आहेत. अर्थात प्रत्येकचवेळी हे संकेत पाळले जात नाहीत. आता कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध करावी असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट भाजपविरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तुतर्ततरी पोटनिवडणूक बिनविरोध होणे अवघड जाणवत आहे.
बिनविरोध निवडणुकांसाठी भाजप आग्रही आहे. त्यासाठी बिनविरोध निवडणुकांचा दाखला दिला जात आहे. त्याचवेळी मविआ नेते मात्र भारतीय जनता पक्षाने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली असल्याचा दाखला देत आहेत. निवडणूक झालीच तर जागा सोडायची कुणाला, यावरून महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने कसबा मतदार संघावर दावा केला आहे. अशात निवणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या घडामोडी निश्चितच रंजक ठरतील.
कसबाचा इतिहास
कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये अरविंद लेले या मतदार संघातून आमदार झाले होते. १९८४ मध्ये काँग्रेसचे उल्हास काळोखे विजयी झाले. १९८९ नंतर पुन्हा भाजपाचा विजयी झाला. १९९१ साली भाजपचे विद्यमान आमदार अण्णा जोशी लोकसभेवर निवडून गेले. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वसंत थोरात यांनी गिरीष बापट यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र १९९५ पासून सलग पाच वेळा गिरीष बापट विजयी झाले. त्याच मतदार संघातून मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
चिंचवडसाठी राष्ट्र्वादी आग्रही
पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. ते पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. नंतर भाजपात प्रवेश केला होता. ही जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्याचवेळी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे नाव पुढे आले आहे. तर राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे, भाऊसाहेब भाईर, नाना काटे, मोरश्वर भोंडवे, नवनाथ जगताप अशी मोठी यादी आहे.
मविआच्या हालचाली
कसबा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला आहे. तर, लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. नंतर ते भाजपत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असल्याने त्याआधी होणारी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे राजकीय पक्षांचे मत आहे. त्यादृष्टीनेही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
Pune By Poll Election Politics Parties Preparation