नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज १३ राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्यात मोठे फेरबदल केले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारत त्यांनी रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्या जागी अरुणाचलचे ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे.
राष्ट्रपतींनी लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीमचे राज्यपाल, झारखंडसाठी सी पी राधाकृष्णन, आसामसाठी गुलाबचंद कटारिया, हिमाचल प्रदेशसाठी शिव प्रताप शुक्ला, आंध्र प्रदेशसाठी न्यायमूर्ती (निवृत्त) एस अब्दुल नझीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
President New Appointments 12 States Governor