नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे राईट हँड अशी ओळख असलेल्या भाऊ चौधरी यांनी मध्यरात्री २ वाजता शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. चौधरींची हकालपट्टी करण्यात आल्याचे ट्विट संजय राऊत यांनी काल रात्री केले होते. त्यानंतर चौधरी हे मध्यरात्री शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नाशकातील ११ माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संपर्क प्रमुखही गेले आहे. चौधरींनीच या सर्व माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे #नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mgDkyuSIc3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2022
शिंदे गटात प्रवेश करताच चौधरी यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चौधरी म्हणाले की, मी गेली ३२ वर्षे शिवसेनेत काम करत आहे. गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, डोंबिवली शहर प्रमुख म्हणून मी जबाबदारी सांभाळली. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन मी गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदनेही दिली. मात्र, त्यातील एकही काम मार्गी लागले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. विकासावर त्यांचा भर आहे. त्यामुळे मला जाणीव झाली की त्यांच्या नेतृत्वात मी अधिक चांगली जबाबदारी पार पाडू शकतो. यापुढील काळात मी माझ्या कामातून उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्हा सपंर्क प्रमुख श्री .भाऊसाहेब चौधरी , नाशिक जिल्हा प्रमुख (ग्रामीण ) श्री . सुनील पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश ..@mieknathshinde @DrSEShinde @rautsanjay61 pic.twitter.com/ZPfgTOmKV8
— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 22, 2022
Politics Shivsena Bhau Chaudhari Shinde Group Join