मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘लोक माझा सांगाती’ हे पुस्तक त्यातील मजकुरामुळे चांगलेच गाजत आहे. या पुस्तकातील मजकुराचा धसका कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताहेत तर कधी उद्धव ठाकरे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी सावरासावर करत पुस्तकार जे लिहीले त्यामागे ठाकरे यांना नाराज करण्याचा हेतू नव्हता, असे म्हटले आहे.
कोर्ट ठाकरेंचा राजीनामा परत घेऊ शकत नाही. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार पुन्हा आणले असते, असे स्पष्ट मत कोर्टाने नोंदवले. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा अंतिम घटका मोजत होते तेव्हा इतर मित्रपक्षांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आवाहन केलेले. पण, उद्धव ठाकरेंनी तो मुद्दा न मानत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोर्टाने त्याबद्दल आज मत मांडले. विशेष म्हणजे त्याबद्दल शरद पवार यांना आज प्रश्न विचारला असता त्यांनी जे झाले त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे मत मांडले.
हल्लीच माझे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात हा विषय आहे. त्यात मी स्पष्ट लिहिले आहे, मी स्पष्ट लिहिल्यामुळे आमच्या मित्रपक्षात नाराजी झाली. पण माझा नाराज करण्याचा हेतू नव्हता. ती वस्तुस्थिती होती. सुप्रीम कोर्टाने ती स्पष्ट केली आहे. ठिक आहे जे झालं ते झालं. आम्ही उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करू, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
विधानसभा अध्यक्षांकडे महत्त्वाचा मुद्दा
विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सोपविला आहे. याबद्दल अध्यक्षांनी योग्य वेळेत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुप्रीम कोर्टाची आहे. आपण बघुया ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील तेव्हा कोर्टाचा निकाल जो कालावधी संदर्भात आहे, ते आमचे म्हणणे मांडून निर्णय घेतील त्याला किती वेळ जाईल ते बघावे लागेल, असे शरद पवार म्हणालेत.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील काही मुद्द्यांमध्ये कोर्टाने साधारणपणे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यासंबंधीची तीव्र भूमिका मांडली. या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे त्याचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा विषय सोपवण्यात आला आहे. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्यात येईल, असे पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष हे इन्स्टिट्युशनल पद आहे. या पदाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी या पदाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अपेक्षा आहे इन्स्टिट्युशनसंबंधी या लोकांमध्ये किती आस्था आहे, हे उद्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले.
माझ्या पुस्तकात मी याबाबत स्पष्टपणे लिखाण केल्याने आमचे मित्र नाराजही झाले. पण त्यामागे नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. आज सुप्रीम कोर्टाने तीच गोष्ट व्यक्त केली. मात्र झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Politics Sharad Pawar on Uddhav Thackeray