मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल सध्या उलटसुलट राजकीय चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपसोबत सत्तेत जाणार असल्याचे बोलले जात आहे. अश्यात संजय राऊत यांनीही या चर्चेत जाहीर उडी घेतली. त्यावर अजित पवार यांनी मात्र ‘कोण संजय राऊत?’ असा एकच प्रश्न करून सारेकाही स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने पवार कुटुंबीयांना टार्गेट केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून केला होता. त्याच कालावधीत अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असल्याचे म्हटले होते.
सर्वांचे बोट अजित पवारांकडे आहे, असे समजून त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अजित पवार यांनी पत्रकारांपुढे येत ‘जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत असेन’ असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांनी भूमिका मांडावी, असे माध्यमांना सांगितले. त्याबद्दल आज पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारले असता अजित पवार यांनी ‘कोण संजय राऊत?’ असा उलट सवाल पत्रकारांना विचारला. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.
अंगाला का लागावं?
पुण्यात अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. त्याचवेळी त्यांना सध्याच्या राजकीय चर्चांबद्दल विचारण्यात आले. विशेषतः संजय राऊत यांच्या विधानाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर ‘कोण संजय राऊत? मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं?’ असा उलट सवाल अजितदादांनी पत्रकारांना केला.
Politics NCP Leader Ajit Pawar on MP Sanjay Raut