मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली का, अंजली दमानिया यांनी ट्विट केल्यानुसार, आपण भाजपसोबत जाणार का याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
गारपीठीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीठ जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे.या संदर्भात आज भेट घेतली असे अजित पवार यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का अशी वक्तव्य करतात. त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर निर्माण होवू शकते. पण त्या गोष्टी मिडियापर्यंत जाण्याऐवजी त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उध्दव ठाकरे यांच्याशी बोलावे. यातून मार्ग निघू शकतो ना. टाळी एका बाजूने वाजत नाही ना. अशाप्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रात काम करणारा जो कार्यकर्ता आहे (त्या- त्या पक्षाचा) तोही संभ्रमात पडतो. त्यामुळे अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळी या गोष्टी मांडणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
कॉंग्रेस अंतर्गत जो विषय त्यासंदर्भात मी बोलू इच्छित नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी – त्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आपापल्या स्तरावर सोडवावे. आम्हाला सुचना करण्याचा अधिकार नाही आणि नाक खुपसायचाही अधिकार नाही. मात्र आघाडी टिकावी असे वाटते असेही मत अजित पवार यांनी मांडले.
कुणामुळे कुणाच्या जीवाला धोका असेल आणि ज्याने तक्रार दिली असेल तर सरकारने संरक्षण दिले पाहिजे. गंभीर असेल तर स्टेनगनधारी संरक्षण दिले पाहिजे.तुम्हाला तरी वाटते का ?की ,माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा व सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा, असा माणूस आहे असे अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार अशा शब्दात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांच्या ट्वीटवर भाष्य केले.
Politics NCP Leader Ajit Pawar on Clean Chit BJP Alliance