नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील बैठका राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करीत असतात, हे आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोच आहे. त्यातही भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना तातडीच्या बैठकीसाठी बोलावले की त्यातून आणखी काहीतरी बातमी हाती लागण्याची शक्यता असते. आज (मंगळवार) अमित शहांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वेगळी बैठक घेऊन या बातमीची शक्यता निर्माण केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीच्या बैठकीसाठी देशभरातील नेत्यांना दिल्लीत आमंत्रित केले आहे. यात भाजपच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. अमित शहांनी सहकार विभागाशी संबंधित बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात आले. देशभरातील नेत्यांशी या विभागाबाबत महत्त्वाची चर्चाही झाली. पण, ही बैठक आटोपल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र आणि शिंदे यांच्यासोबत वेगळी बैठक घेतली. ही बैठक बराचवेळ चालली.
या बैठकीत महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा चर्चेला होता, असे सांगितले जात आहे. कारण महाराष्ट्रातही पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे आणि त्यादृष्टीने काही लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अश्यात राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार हाच मुख्य मुद्दा बैठकीत होता, असे सांगितले जात आहे. यासोबतच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील नेत्यांना संधी देण्याचा विषयही या बैठकीत चर्चेला येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोश्यारींची राजीनाम्याची इच्छा!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा मुद्दा देखील अमित शहा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला घेऊ शकतात. कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्याविरोधात सर्वच पक्षांमध्ये रोष निर्माण झालेला असल्याने त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सहकार क्षेत्रातील कर्जांची पुनर्रचना
आज अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सहकार क्षेत्रातील कर्जांची पुनर्रचना करण्याबाबत विचारविनिमय झाला. जे साखर कारखाने अडचणीत आहेत, त्यांना कर्जाच्या स्वरुपात मदत करण्याचा निर्णय सरकार घेईल, असे चित्र आहे.
Politics Fadnavis and Shinde Amit Shah Meet Delhi