मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी काय किंवा भाजप-शिंदे गटाचं सरकार काय… नाराज होणाऱ्या आमदारांची संख्या कमी नसते. त्यातल्या त्यात बच्चू कडू हे कायमच नाराजांच्या यादीत बघायला मिळतात. शिंदे गटासोबत सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर नाराजीची वेळ येणार नाही, असे वाटले होते. पण इथेही दुर्दैवाने त्यांच्या नशिबी नाराजीच आली आहे.
एखाद्या आमदाराला नाराजी दोनच गोष्टींवरून असते. एकतर आपलेच सरकार असून कामं होत नाहीत म्हणून किंवा मंत्रीपदाचं आश्वासन मिळूनही संधी मिळत नाही म्हणून. बच्चू कडू यांच्याबाबतीत दीर्घकाळ प्रतिक्षा हे नाराजीचं कारण असल्याचं स्पष्ट आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या लॉटमध्ये जे मंत्री झाले त्यात बच्चू कडूंचा समावेश नव्हता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि आपल्याला संधी मिळेल म्हणून ते वाट बघत राहिले. पण आता सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्ताराचं नाव नाही, त्यामुळे ते संतापले आहेत. अलीकडेच त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असे म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होणार आणि त्यात आपल्याला संधी मिळणार का, असा प्रश्न बच्चू कडू यांना पडला आहे. सरकारमधील प्रमुख लोकांनी विस्ताराबाबत स्पष्ट भूमिका घेऊन जनतेतील संभ्रम दूर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जाहीर नाराजी
बच्चू कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या सहा महिन्यात ते बरेचदा विविध कारणांनी नाराज झाले आहेत आणि प्रत्येकवेळी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देत राहिले आहेत. पुढील विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये आहेत. त्यामुळे आता कुणालाही मंत्रीपद मिळाले तरी ते एक वर्षापेक्षा जास्त काळ राहणार नाही, हे तर निश्चित आहे.
अंतर्गत धुसफुस
मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसफुस सुरू झाली आहे. कधी मंत्रीपदावरून, तर कधी सरकारमध्ये कामं होण्यावरून ही धुसफुस सुरू आहे. त्यामुळेच विस्ताराची प्रक्रिया लांबत असल्याचे सूत्रांकडून कळते.
‘थेट सांगा ना’
मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर सांगा, नाहीतर शक्य नाही म्हणून सांगून द्या. सगळे शांततेत सरकारमध्ये राहतील. आणि काही अडचणी असतील तर त्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कराव्या, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Politics Cabinet Expansion MLA Bacchu Kadu Nervous
Prahar