इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पतंजली या योगगुरु बाबा रामदेव यांच्या समुहाच्या पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंडमधील आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पतंजली समूहासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पतंजली मार्फक मधुग्रीट, बीपीग्रीट, थायरोग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधे प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
केरळचे डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी पतंजलीच्या औषधांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन करण्यात आले होते. या औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या औषधांचे पुन्हा उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणे बंधनकारक असणार आहे.
या कारवाईच्या बातम्या समोर येत असल्या तरी आदेशाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले असल्याचेही आता समोर येत आहे. ही कारवाई चुकीची असल्याची आणि आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून जाणूनबुजून केली गेल्याचा आता आरोपही रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा पतंजलीचे वेगवेगळे प्रॉडक्ट चर्चेत आले होते. आता करण्यात आलेल्या थेट कारवाईमुळे पतंजली समुहाला आर्थिक फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
Patanjali Baba Ramdev 5 Medicines Ban Production