मुंबई – बार मालकांकडून जबरदस्तीने वसुलीच्या प्रकरणात मुंबई पोलिस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने पैसे जमवले. परमबीर सिंह हे ‘नंबर एक’ असल्याचे सांगत वसुली केल्याचा आरोप सचिन वाझेने केला आहे. मुंबई पोलिसांनी हा दावा एका आरोपपत्रात केला आहे. सचिन वाझेच्या माहितीनुसार वसुलीचे ७५ टक्के पैसे परमबीर सिंह यांच्याकडे जात होते, उर्वरित पैसे तो स्वतःजवळ ठेवत होता, असा आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगावात दाखल एका वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह आणि इतर तिघांविरुद्ध शनिवारी महानगर न्यायदंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांच्यासमोर ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले हे पहिले आरोपपत्र आहे. इतर आरोपींमध्ये सुमीत सिंह आणि अल्पेश पटेल जामिनावर आहेत. तर विनायक सिंह आणि रियाझ भट्टी इच्छित आरोपी आहेत.
या आरोपपत्रानुसार, परमबिर सिंह यांना वाजे ‘नंबर एक’ म्हणून संबोधत होता. ‘नंबर एक’ ने पैसे मागितले आहेत. याला तीन ते चार साक्षीदारांनी दुजोरा दिला आहे. वाझेला अनेक प्रकरणांची चौकशी करण्यास सांगितले होते. तो पोलिस आयुक्तांची थेट भेट घेत होता आणि महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी करत होता. यावरून तो सिंह यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होता हे दर्शविते. सिंह, वाझे आणि इतर आरोपी क्रिकेट सट्टेबाजांसह बार मालकांकडून पैसे मागत होते. पैसे दिले नाही तर त्यांना अटक करण्यासह त्यांच्या ठिकाणांवर छापे मारण्याच्या धमक्या देत होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपीने बार आणि रेस्टॉरंटवर छापेमारी करू नये यासाठी नऊ लाख रुपये वसूल केले आणि जवळपास २.९२ लाख रुपयांचे दोन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सक्ती केली होती. तक्रारकर्ते अग्रवाल हे एका रेस्टॉरंट आणि बारचे भागिदार होते. ही घटना जानेवारी २०२० आणि मार्च २०२१ च्या दरम्यान झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाख करण्यात आला होता.