काबूल – अफगाणिस्तानवर ताबा मिळविणारी दहशतवादी संघटना तालिबान आणि पाकिस्तानदरम्यान संबंध असल्याचे अनेक पुरावे नजीकच्या काळात पाहायला मिळाले आहेत. त्याचा आणखी एक पुरावा उघड झाला आहे. इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुखे जनरल फैज हामीद तसेत पाकिस्तानी अधिकार्यांचे एक उच्चस्तरिय शिष्टमंडळ काबूलला पोहोचले आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार कामरान खान यांनी दिली आहे.
तालिबान परिषदेच्या अधिकृत निमंत्रणावरून काबूलला पोहोचणारे फैज हामीद हे सर्वात वरिष्ठ परदेशी अधिकारी आहेत. पाकिस्तानचे तत्काळ भविष्य आणि अफगाणिस्तानची सुरक्षा, आर्थिक आणि व्यापारीक संबंधांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तालिबानची चर्चा
तालिबानच्या दूतावासाचे उपसंचालक शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिकझई यांनी अफगाणिस्तानाच्या पुनर्निर्माणासह इतर मुद्द्यांवर पाकिस्तानच्या राजदूतांशी कतारमध्ये चर्चा केली आहे. तालिबान प्रवक्ता सुहेल शाहीनने ही माहिती दिली आहे. दोन्ही बाजूंनी अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती, मानवीय सहकार्य, आपसातील हितसंबंध, सन्मान, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केल्याचे शाहीन याने सांगितले.
तालिबानला पाठिंबा
स्वतःला अफगाणिस्तानचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे तसेच पंजशीरमध्ये बंडखोरांमध्ये सहभागी झालेले अमारुल्लाह सालेह यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. मी देशातून पलायन केलेले नाही असे सांगत त्यांनी दहशतवादी संघटना तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.