इस्लामाबाद – जीवनात जलद प्रगती करायची असेल, तर काही वेळा कर्ज घ्यावेच लागते, तसेच देशाच्या विकासाबाबत देखील म्हणता येईल. देश विकासासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. परंतु व्यक्ती असो की देश कर्जाच्या खाईत बुडाला की, त्यातून काही वेळा वर येणे कठीण होऊन बसते. मग कर्जातून बाहेर येण्यासाठी पुनः पुन्हा कर्ज, असे चक्र सुरू राहते. आपल्या शेजारील देशाचे देखील सध्या असेच झाले आहे.
आधीच कर्जामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी इम्रान खान यांनी सौदी अरेबियाकडून ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. सध्या आर्थिक अडचणीत पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सौदी अरेबियाकडे मदत मागितली होती. ही रक्कम त्याचाच एक भाग आहे. मात्र पाकिस्तानला हा निधी ४ टक्के व्याजदराने मिळाला आहे.
सध्या पाकिस्तान हा देश अती चलनवाढ कमी होत चाललेला परकीय चलन साठा, चालू खात्यातील वाढती तूट आणि घटते चलन मूल्य यासह वाढत्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. येथील केंद्रीय बँकेच्या आकडेवारीवर आधारित पाकिस्तानची एकूण तरल विदेशी साठा २२, ४९८अब्ज डॉलर्स आहे. मात्र गळ्यापर्यंत कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
एका अहवालात म्हटले आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांनी रियाधला भेट देऊन क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केल्यानंतर सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला आर्थिक मदत एक महिन्याहून अधिक कालावधीनंतर आली आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला ४.२अब्ज डॉलरची मदत देण्याचे मान्य केले, त्यापैकी ३ अब्ज डॉलर पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेत ठेवी म्हणून हस्तांतरित केले जाणार होते.
पंतप्रधान इम्रान खान यांचे वित्त आणि महसूल सल्लागार शौकत तरीन यांनी स्पष्ट केले की, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून ३ अब्ज डॉलर मिळाले आहेत. सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला एका वर्षासाठी ४ टक्के व्याजदराने पॅकेजच्या अटींनुसार कर्ज मिळाले असून गेल्या महिन्यात स्वाक्षरी करण्यात आली होती. आता पाक सरकारचा असा विश्वास आहे की, या करारामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा मजबूत होईल आणि कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई होईल. तसेच यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणखी वाढतील.