केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे फास आवळले. दहशतवादी घटनांमध्ये घट होत असतानाच पाकिस्तान आणि आयएसआयने आपली रणनीती बदलली आहे. काश्मीरमधील तरुणांना ते हायब्रिड दहशतवादी (पार्टटाइम दहशतवादी) बनवत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. स्लीपर सेलप्रमाणे हे पार्टटाइम दहशतवादी निशस्त्र लोकांवर हल्ले करत आहेत.
काश्मीरमध्ये काही राजकीय नेते आणि पोलिसांच्या नुकत्याच झालेल्या हत्यांमध्ये हायब्रिड दहशतवाद्यांचा सहभाग होता. पोलिस महासंचालक विजय कुमार सांगतात, श्रीनगरमध्ये स्लीपर सेल आणि हायब्रिड दहशतवाद्यांची उपस्थिती आहे. घटना घडवून आणल्यानंतर हायब्रिड दहशतवादी सामान्य काम सुरू करतात. त्यामुळे या दहशतवाद्यांना ट्रॅक करणे कठीण जात आहे. परंतु आता त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवले जात असून, ते लवकरच टिपले जातील.
श्रीनगरसह काश्मीर खोर्यात काही आठवड्यांमध्ये सॉफ्ट टार्गेट्सवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षारक्षकांच्या यादीत दहशतवादी म्हणून नाव नसलेल्या काही पिस्तुलधारी तरुण असे हल्ले घडवत आहेत. दहशतवादी संघटनांडून अशा तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी सज्ज ठेवले जाते. एक टास्क झाल्यानंतर ते दुसर्या टास्कच्या प्रतीक्षेत असतात. यादरम्यान ते आपले सामान्य कामेही करत असतात.
निशस्त्र लोकांवर हल्ले
हताश पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांनी आपल्या पद्धतींमध्ये बदल केला आहे. हायब्रिड दहशतवादी निशस्त्र आणि विरोध न करणार्या सॉफ्ट टार्गेट्सवर हल्ले करत आहेत.यामध्ये व्यावसायिक, अल्पसंख्याक समाजाचे लोक, सुरक्षा नसलेले राजकीय पक्षाचे नेते आणि ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे तसेच व्यावसायिक आणि सामाजिक कामे रोखणे हाच त्यांचा उद्देश आहे.
दुबळे लोक टार्गेट
फुटीरतावाद्यांविरोधातील आवाज दाबणे, हिंसाचाराला विरोध करणार्या लोकांवर हल्ले करणे, ही त्यांची कामे आहेत. अशा प्रकारचे हल्ले पूर्वनियोजित असतात. हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी अशा लोकांचे दैनंदिन व्यवहार माहिती करून घेतात. दुबळी बाजू जाणून घेत त्यांच्यावर हायब्रिड दहशतवादी हल्ला करतात. ते कोणाची हत्या करत आहेत, याबाबत त्यांना काहीही देणेघेणे नसते.
हायब्रिड दहशतवादी कोण?
दहशतवाद्यांच्या यादीत नसलेले लोक हायब्रिड दहशतवादी असतात. स्लीपर सेलप्रमाणेच तरुणांना पार्टटाइम दहशतवादी बनवतात. अशा लोकांचे ब्रेन वॉश करून त्यांना कट्टर बनविले जाते. संघटनांकडून दिले गेलेली टास्क ते पूर्ण करतात आणि त्यानंतर ते आपले सामान्य कामे करू लागतात. त्यांची ओळख पटविणे कठीण ठरते.